इंडियन योग असोसिएशनच्या वतीने विशेष गौरव
पुणे : योगप्रसाराच्या माध्यमातून मानवतेसाठी अविरतपणे केलेल्या बहुमोल योगदानाची दखल घेऊन इंडियन योग असोसिएशनच्या वतीने आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांना ‘योग चिकित्सारत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. इंडियन योग असोसिएशन ही राष्ट्रीय पातळीवर योगप्रसाराचे काम करणारी एक महत्त्वाची संस्था असून या संस्थेच्या वतीने योगप्रसाराचे कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा या खास पुरस्काराच्या रूपाने गौरव केला जातो. महर्षि विनोद रिसर्च फौंडेशनच्या माध्यमातून अभिजात योगसाधना आणि योगोपचार या दोन्ही स्तरांवर गेली ५० वर्षे आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद अखंडपणे जे कार्य करीत आहेत, त्या कार्यासाठी हा विशेष पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. हंसाजी योगेंद्र व सरचिटणीस सुबोध तिवारी यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. योगगुरु स्वामी रामदेव बाबा, अध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर, सद्गुरु जग्गी वासुदेव, डॉ. प्रणव पंड्या, डॉ. नागेंद्रजी, डॉ. ईश्वर बसवरड्डी, हे देखील इंडियन योग असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत.
आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद हे गेल्या ५० वर्षांपासून योगप्रसाराचे कार्य आंतरिक तळमळीने करीत आहेत. आजवर देश-विदेशातील हजारो साधकांना त्यांनी अभिजात योगसाधना शिकवली असून उत्तम जीवन जगण्याची जीवनदृष्टी त्यांनी प्रदान केलेली आहे. आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. अभिजात योगसाधना लोकांना सोपेपणाने समजावी यासाठी त्यांनी इंग्रजी व मराठी भाषेतून अनेक पुस्तकांचे लेखनही केलेले आहे. अलीकडेच त्यांच्या वयाचा अमृतमहोत्सव आणि योगप्रसाराचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला.