पुणे : विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेस ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्य, आवश्यकता, हिंदुत्वाचा जागर आदी जनमानसापर्यंत पोहोचविण्याकरिता पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये २४६ ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २४ आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान ही संमेलने होत असून आजपर्यंत १०० हून अधिक संमेलन झाली आहेत. यामध्ये हिंदू समाज, विविध संप्रदायातील संत, धर्मगुरू, प्रवचनकार सहभागी होत आहेत. या संमेलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने हिंदू समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेला प्रांत सहमंत्री अॅड. सतीश गोरडे, बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन, पुणे पूर्व विभागाचे मंत्री धनंजय गायकवाड आणि पश्चिम विभागाचे मंत्री केतन घोडके आदी उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, हिंदू संमेलनात विश्व हिंदू परिषदेची साठ वर्षाची वाटचाल, आजपर्यंतच्या कार्याची माहिती, हिंदू समाजासमोर आव्हाने, कुटुंबप्रबोधन, भविष्यातील कार्य बांगलादेशापुढील मुळे निर्माण झालेली स्थिती आणि या पुढील काळात हिंदू हा राजकारणात मुख्य केंद्रबिंदू असणार आहे, अशा अनेक विषयांवर परिषद आपले विचार मांडत आहे. सच्च्या हिंदू समाजाला अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये धार्मिक ओळख आणि संस्कृतीचे रक्षण, प्रांतवाद, जातीवाद, धार्मिक स्थळांची सुरक्षितता, असमतोल लोकसंख्या यामुळे हिंदू समाजाचा विकासदर घटत चालला आहे, असे दिसते आहे. अशा अनेक विषयांसाठी देखील विश्व हिंदू परिषद चिंतन करत आहे. गोवंश हत्याबंदी कायदा व धर्मांतरणविरोधी कायदा यावा, अशी परिषदेची मागणी आहे.
अॅड.सतिश गोरडे म्हणाले, हिंदू धर्माचा प्रसार आणि हिंदूचे संघटन हे प्रमुख उद्देश समोर ठेवून २९ आॅगस्ट १९६४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्मीच्या पवित्र दिवशी, पूज्य स्वामी चिन्मयानंद यांच्या मुंबई येथील आश्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. तत्कालिक सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, मास्टर तारासिंग, ज्ञानी भूपेंद्र सिंग (अध्यक्ष शिनीमणी अकाली दल), डॉ. के. एम. मुग्री, स्वामी शंकरानंद सरस्वती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वि. जी. देशपांडे (तत्कालीन महामंत्री हिंदुमहासभा), बॅरिस्टर एच. जी. अहवामी, राजपाल पुरी, श्रीराम कृपलानी (त्रिनिदाद )आदी विचारक आणि संत यांच्यासह चाळीस विभूतींनी या संघटनेची घोषणा केली होती. साधू संताचे आशिर्वाद संघटनेच्या मागे नेहमीच राहिले आहेत आणि त्याच प्रमाणे साधू संत हेच विश्व हिंदू परिषदेचे खरे मार्गदर्शक ठरले आहेत.
सन १९६६ साली प्रयाग येथे इलेल्या पहिल्या हिंदू परिषदेमध्ये सर्व पंथाचे धर्मगुरू आणि संत एका मंचावर आले आणि धर्मांतरित हिंदूंना, धर्मामध्ये पुन्हा घेण्याचा ठराव घेण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे गौ रक्षणाबाबतीतचे प्रयत्न देखील महत्वाचे आहेत. गोहत्येविरोधातील कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी विश्व हिंदू परिषद सदैव कार्यरत असते. केवळ गोरक्षा नहे तर गोधारित शेतीचे तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहोचवून गोमातेला कत्तलखान्या पर्यंत जाण्यास रोखण्याचे काम देखील विश्व हिंदू परिषद देशभरात करत आहे. गोशाळा आणि गो आधारित शेतीच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असते.
अवैध धर्मांतर रोखण्यासाठीही विश्व हिंदू परिषद मोलाचे कार्य करत आहे, आता पर्यंत लाखों हिंदूंचे धर्मांतरण थांबविले असून, लक्षावधी हिंदूंना स्वधर्मात परत आणते आहे. विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र विधी प्रकोष्ठ संचालित कौटुंबिक मोफत समुपदेशनाचे कार्य गेल्या २ वर्षांपासून सुरु आहे. रामजन्मभूमी आंदोलन आणि विश्व हिंदू परिषदेचे असणारे अतूट नाते सर्वांनाच परिचयाचे आहे. साधू संतांना विश्व हिंदू परिषदेने रामभूमी मुक्त करण्याचे वचन दिले होते आणि २२ जानेवारी २०२४ रोजी ते पूर्ण झाले. आता परिषदेच्या षष्टीपूर्तीनिमित्त देशभरात हिंदू संमेलनाचे आयोजन होत असून सर्वांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठीपूर्ती (६० वर्षे) पश्चिम महाराष्ट्रात २४६ ठिकाणी हिंदू संमेलने
Date:

