पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयात नवे एमआरआय मशीन येऊन वर्ष उलटले पण ती अद्याप सुरु न झाल्याने रुग्णांना MRI साठी बाहेर पाठविले जाते आहे. राज्यातील अत्यंत महत्वाच्या व संवेदनशील असणाऱ्या ससून शासकीय रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल आणि गैरसोय होत आहे. बंद असणारी ही एमआरआय मशीन तात्काळ सुरु का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.MRI मशीन आल्यावर ती बसविण्यासाठी सुमारे ६ महिने विलंब का झाला असाही सवाल करण्यात येतो आहे.
“रुग्णांना खाजगी रुग्णालयात अथवा लॅबमध्ये जाऊन एमआरआय स्कॅन करण्याचा ‘खर्चिक सल्ला’ रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आमच्याकडे जर पैसे असले असते, तर आम्ही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलो असतो का? असे प्रश्न केले जात आहेत.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व अधीक्षक यलप्पा जाधव हे अनेक दिवसांपासून सुट्टीवर असल्याने रुग्णांवरील उपचार व त्यांची व्यवस्था रामभरोसे आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास व इतर प्रशासकीय समस्या उद्भवल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.