पुणे- शहरातील मुळा मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शन मागे वाॅटर फ्रंट साेसायटीजवळ नदीपात्रात वाहून आलेला एका तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह असलेल्या १८ ते ३० वयाेगटातील तरुणीचा असून तिचे डाेके, हात, पाय धारदार हत्याराने कापून तिचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचे दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, चंदननगर पाेलिस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
पाेलिसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असून आराेपींचा शाेध देखील सुरु करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणातून नदीपात्रात माेठ्या प्रमाणात पाणी साेडले जात असल्याने नदीत दुथडी भरुन वाहत आहे. परंतु पावसाचा जाेर कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विर्सग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी हाेऊ लागल्यानंतर खराडी भागात बांधकाम ठिकाणावर काम करत असलेल्या काही मजुरांना नदीपात्रात एक संशयास्पद मृतदेह दिसून आला.
पाेलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मृत महिला अज्ञात ठिकाणी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन जीवे ठार मारुन तिचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीराचे धडापासून शिर, दाेन्ही हात खांद्या पासून, दाेन्ही पाय खुब्यापासून काेणत्यातरी धारदार हत्याराने कापले. धड काेठेतरी मुळा मुठा नदीपात्रात टाकून दिले असून ते टाकुन दिलेले धड जेनी लाईट कन्सट्रक्शनचे मागे मुळा मुठा नदीत मिळून आले आहे. सदर महिला रंगाने सावळी असून तिच्या उजव्या काखेच्या खाली काळा व्रण आहे, अशी माहिती चंदननगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.