पुणे-११ डिसेंबर, २०२३: टाटा पॉवर समूहातील एक कंपनी आणि आघाडीच्या ईव्ही चार्जिंग सुविधा पुरवठादार कंपन्यांपैकी एक, टाटा पॉवर ईव्ही चार्जिंग सोल्युशन्स लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांच्या दरम्यान एक समझोता करार करण्यात आला आहे. भारतभर वेगवान आणि अल्ट्रावेगवान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग पॉईंट्स तैनात करण्यासाठी हा समझोता करण्यात आला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून टाटा पॉवर आयओसीएलच्या विविध रिटेल आउटलेट्सच्या ठिकाणी ५०० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल करणार आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद, पुणे आणि कोची यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, सालेम-कोची हायवे, गुंटूर-चेन्नई हायवे आणि गोल्डन क्वाड्रीलॅटरल यासारख्या मोठ्या महामार्गांवर हे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल केले जातील. विविध शहरांदरम्यान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंगचे विश्वसनीय आणि विशाल नेटवर्क उभारण्यावर ही धोरणात्मक भागीदारी लक्ष केंद्रित करेल. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करत असताना ईव्ही मालकांना रेन्जची चिंता करावी लागणार नाही.
टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंगचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे हेड श्री. वीरेंद्र गोयल यांनी सांगितले, “देशात ईव्ही चार्जिंगचे विशाल नेटवर्क स्थापित करण्याच्या दृष्टीने आयओसीएलसोबत आमची भागीदारी हे महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आम्ही उचलत आहोत. आयओसीएलच्या विशाल उपस्थितीचा उपयोग करवून घेत टाटा पॉवर देशभरातील विविध प्रदेशांमध्ये वेगवान आणि अति वेगवान चार्जिंग पॉईंट्स उभारेल, त्यामुळे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक मोबिलिटी भवितव्य निर्माण करण्यासाठी पोहोच व समावेशकता यामध्ये योगदान दिले जाईल.”
तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नाविन्यपूर्ण सुविधा यांच्यामार्फत ईव्ही युजर्सना अधिकाधिक प्रगत अनुभव मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर वचनबद्ध आहे. टाटा पॉवर ईझेड चार्ज ऍप आणि इंडियनऑइल ई-चार्ज मोबाईल ऍप या दोन्हींमार्फत अगदी सहजपणे ईव्ही चार्जिंग करून घेण्याचा दुहेरी लाभ ईव्ही युजर्सना मिळवता येईल. या दोन्ही ऍप्सच्या साहाय्याने युजर्स आपल्या जवळचे व सोयीचे चार्जर्स शोधून ते बुक करू शकतील.
इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याच्या वाढत्या ट्रेंडला अनुसरून उत्पादने, सेवासुविधा सादर करण्याची कॉर्पोरेशनची बांधिलकी अधोरेखित करत, आयओसीएलचे कार्यकारी संचालक (रिटेल-एनअँडई) श्री. सौमित्र श्रीवास्तव यांनी सांगितले, “ऊर्जा सुविधा आउटलेट्सना परिपूर्ण बनवण्यासाठी रिटेल नेटवर्कमध्ये परिवर्तन घडवून आणून २०२४ सालापर्यंत १०००० ईव्ही चार्जिंग स्टेशन्स पुरवण्याची आयओसीएलची योजना आहे. सध्या ६००० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग स्टेशन्स असून, आमची कंपनी स्वतःची पोहोच सातत्याने वाढवत आहे. टाटा पॉवरसोबत आमची धोरणात्मक भागीदारी या परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे. या क्षेत्रातील आव्हानांना दूर सारून संधींचा लाभ घेण्यासाठी आयओसीएलमध्ये आम्ही सज्ज आहोत, ज्यामुळे अधिक पर्यावरणपूरक मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल सहजसाध्य होईल.”समझोता करारावर स्वाक्षऱ्या करताना टाटा पॉवर आणि आयओसीएलच्या अधिकाऱ्यांबरोबरीनेच आयओसीएलचे रिटेल ट्रान्सफॉर्मेशनचे चीफ जनरल मॅनेजर श्री. के नवीन चरण, मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे चीफ जनरल मॅनेजर श्री सौमित्र चक्रबोर्ती आणि टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंगचे बिझनेस डेव्हलपमेंटचे हेड श्री वीरेंद्र गोयल उपस्थित होते.
जवळपास ६०% इतक्या लक्षणीय बाजारपेठ हिस्सेदारीसह टाटा पॉवरने इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग क्षेत्रातील नेतृत्वस्थान पटकावले आहे. टाटा पॉवरचे संपूर्ण देशभरातील विशाल नेटवर्क ४२० शहरांमध्ये पसरलेले आहे, त्यामध्ये ६२००० पेक्षा जास्त होम चार्जर्स, ४९०० सार्वजनिक आणि अर्ध-सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्स तसेच ४३० बस चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, जी वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि देशभरात चार्जिंग सुविधा पोहोचवत आहेत. हे नेटवर्क सातत्याने वाढत असून संपूर्ण देशभरता इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंगची पोहोच वाढवण्याप्रती टाटा पॉवरची अढळ निष्ठा दर्शवते.

