पुणे : पिंपरी येथील हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्स कंपनीच्या मजदूर संघाने पुण्यातील भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा.मेधा कुलकर्णी यांची एच. ए मजदूर संघाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीने याबाबतचा ठराव केला आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारी कंपनी म्हणून ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’चे (एच. ए.) नाव घेतले जाते. केंद्र सरकारची सार्वजनिक औषध निर्मिती करणारी एच.ए.कंपनी पिंपरीत आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनी आर्थिक संकटात आहे. केंद्रामध्ये ज्या पक्षाचे सरकार आहे, त्या पक्षाचा स्थानिक खासदार हा कंपनी युनियनचा अध्यक्ष असतो, अशी संघटनेची नियमावली आहे. त्यानुसार ‘एचए’ मजदूर संघाचे अध्यक्षपद मोहन धारिया, प्रा. रामकृष्ण मोरे, विदुरा नवले, शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी भूषवले आहे. 2014 मध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. त्यानंतर 2019 मध्ये मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांच्याकडे अध्यक्षपद दिले होते.2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोटक यांच्याऐवजी भाजपने मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली होती. त्यात कोटेच्या पराभूत झाले. ठाकरे गटाचे संजय दीना पाटील निवडून आले. कोटक खासदार नसल्याने अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपविली जाणार याकडे लक्ष लागले होते. केंद्रातील सत्ताधारी भाजपसोबत असलेले शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद देण्याऐवजी पुण्यातील भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा.मेधा कुलकर्णी यांची निवड केली आहे. कुलकर्णी यांनी कंपनीच्या अडचणीच्या काळात आमदार असताना वीज बिलासंदर्भात मदत केली होती. भविष्यात कंपनी सुस्थितीत चालू राहण्यासाठी तसेच कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी (वेतनवाढ, थकीत येणे) केंद्र सरकार मधील संबंधित खात्याचे मंत्री व कंपनी व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वसन खासदार डॉ. कुलकर्णी यांनी दिले आहे.