शैक्षणिक बदलांवर एस. बी. पाटीलच्या शिक्षकांशी साधला संवाद
पिंपरी, पुणे (दि. २२ ऑगस्ट २०२४) केंद्र सरकारने देशातील शैक्षणिक सुधारणांवर भर दिला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२० (एनईपी) दीक्षा, माध्यान्य भोजन, निष्ठा, प्रेरणा, ध्रुव, प्रकाश, युडीआय एसईप्लस, अपार आयडी, सफल, पीएम ई-विद्या, आभासी प्रयोगशाळा तयार करण्यात येत आहेत. याव्दारे वर्तमान आणि भविष्यातील शैक्षणिक बदलांची गरज ओळखून डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. या बदलांसाठी शैक्षणिक संस्था, शिक्षकांनी सज्ज रहावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड ट्रस्ट एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूल येथे भेट देऊन भविष्यात शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या सुधारणांबाबत शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयु नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, उद्योजक नितीन पांडे, शांताराम भोंडवे, प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वसमावेशक शिक्षण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रवेश आणि आरटीई कायदा आणि सरकारने घेतलेल्या इतर डिजिटल शैक्षणिक उपक्रमां बाबत माहिती दिली. अपार आयडी कार्डमुळे वन नेशन, वन स्टुडंट, वन आयडी या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शिशू वर्ग ते पदव्युत्तर प्रमाणपत्रे एकाच ठीकाणी उपलब्ध होतील. आगामी काळात भारतीय शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या गतिमान बदलांबद्दल तसेच एस. बी. पाटील स्कूलने एनईपी २०२० ची अंमलबजावणी आणि आकलन पातळी या बरोबरच प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध केलेल्या सुविधा याबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.