पुणे, दि. २२ ऑगस्ट, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यासंदर्भात नुकतीच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेत ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात विनंती केली. महानगरपालिका आयुक्त भोसले यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी त्यांची सविस्तर मांडणी देखील बैठकीत करण्यात आली.
या कामांबद्दल अधिक माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “माझ्या मतदार संघातील अनेक कामे प्रलंबित असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे सर्व प्रश्न आज मतदार संघाचा आणि शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून मी आयुक्तांसमोर मांडले. आयुक्तांनीही याविषयी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून ही कामे लवकरच पूर्ण होतील असे आश्वासन दिले.”
या कामांमध्ये वाकडेवाडी आणि पांडवनगर येथील पीएमसी कॉलनीच्या पुनर्निर्माणाचा प्रश्न असून हे करीत असताना येथील नागरिकांना विश्वासात घेत आणि त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून हा विकास व्हावा. यासाठी महापालिकेने योग्य व आगावू नियोजन करावे अशी विनंती केली. भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने शिवाजीनगर मतदार संघात सुरु असलेले पुनर्विकास व नवे प्रकल्प उभे राहत असताना रेन हार्व्हेस्टिंग संदर्भातील आवश्यक यंत्रणा बसविण्याबाबत आवश्यक पाहणी महापालिकेने करावी. शहरातील ई स्वच्छतागृह आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा असून त्यांची सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांकडे काटेकोरपणे लक्ष दिले जावे आणि त्याच्या व्यवस्थेसाठी निधीही उपलब्ध करून दिला जावा या मुद्द्यांवर आयुक्तांशी चर्चा झाली.
याशिवाय पाटील इस्टेट भागातील उड्डाणपुलाखालील जागेची स्वच्छता आणि सुशोभीकरण, मतदार संघातील विहिरींचे सर्व्हेक्षण व संवर्धन करणे, न. ता. वाडी सर्व्हे नं २४, संगमवाडी टी पी स्कीम फायनल फ्लॉट नं ५३ येथील निवासी झोन बदलून प्ले ग्राउंड (पीजी) करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदलाची कार्यवाही करावी, नदी पात्रात टाकले जाणारे निर्माल्य त्याच ठिकाणी कम्पोस्ट होत स्वच्छता ठेवावी, ज्यांना मंजुरी मिळाली आहे ती वृक्षछाटणी लवकरात लवकर व्हावी, ठीकठीकाणचे अतिक्रमण काढण्यात यावे या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात देखील आयुक्तांना विनंती केली आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासंदर्भात देखील सर्व बाबी पूर्ण झाल्या असून पुतळ्याची स्थापना लवकरात लवकर करावी याबरोबरच संभाजी उद्यान येथील स्टॉल धारकांना जुन्या ठिकाणी स्टॉल परत मिळण्याबाबत देखील शिरोळे यांनी मागणी केली.
ही मागणी देखील आम्ही केली आहे, असे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
या बैठकीवेळी विविध खात्यांचे अधिकारी, सर्वश्री शैलेश बडदे, आनंद छाजेड, मुकारी अलगुडे, समाधान शिंदे, नंदू मंडोरा, अरविंद परदेशी, सचिन वाडेकर, सुनीता वाडेकर, एस सय्यद, मुजाहिद हुसेन, हेमंत डाबी आदी उपस्थित होते.