दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांचा मुंबई विद्यापिठाने केला विशेष सन्मान
पिंपरी, पुणे (दि. २१ ऑगस्ट २०२४) मुंबई आणी मराठी माणसाचं जिव्हाळ्याच नातं कसं …? “आरं वाघाला नखं, गरुडाला पंख, तशी ही मुंबई मराठी माणसांची. मराठी माणसं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णा भाऊ साठे यांचे योगदान विसरु शकत नाही. अण्णा भाऊंचे साहित्य हे वास्तविकतेला धरुन होते. ते स्वप्नातील लेख लिहणारे लेखक नव्हते, तर वास्तववादी लेखक होते. म्हणून त्यांचे साहित्य त्याकाळी २७ विविध भाषेत भाषातंरीत झाले. रशियात भाषातंर होणारे ते पहिले भारतीय मराठी साहित्यिक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वास पाटील यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या सर कावसाजी दिक्षांत सभागृहात ‘अजरामर साहित्याचे निर्माते अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, राष्ट्रीयत्व आणि वैश्विकता’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापिठाचे कुलगूरु रविंद्र कुलकर्णी, ईलीनोईस विद्यापीठातील आफ्रिकन – अमेरिकन स्टडीचे डॉ. फे. हेरिसन, डेप्युटी कौन्सिल जनरल ऑफ फ्रान्स सामा बोकाजी, मार्गारिटा रुडामिनो ऑल रशियन स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर रशियाचे डायरेक्टर जनरल डॉ. व्हिक्टर कुझमिन, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषन चौरे, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, लोककला विभाग प्रमुख गणेश चंदनशिवे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या सुलतान या कथेवर आधारित ‘सुलतान’ या लघु चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश कांबीकर आणि अभिनेते तानाजी साठे यांचा मुंबई विद्यापीठ आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य नव्या पिढीला समजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ते घरोघरी पोहोचवले पाहिजे यासाठी अविनाश कांबीकर सारख्या तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. सुलतान या लघुपटाचा नुकताच जर्मनीतील २१ व्या भारतीय फिल्म फेस्टिवल मध्ये प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये या लघुपटाला जर्मन स्टार ऑफ इंडियाचे नामाकंन मिळणे म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याला जागतिक पातळीवर मिळालेली सलामी आहे असेही डॉ. विश्वास पाटील म्हणाले.