पुणे-पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाडी (ता. हवेली) येथील दोन्ही निवास स्थानांवर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) आज सकाळी सातच्या सुमारास छापे टाकले आहेत.सकाळी सातपासून दुपारी अडीच ते पावणे तीनपर्यंत म्हणजेच आठ तासांपासून अधिक काळ ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.शिक्रापूर येथील घरी मंगलदास बांदल (Mangalds Bandal) यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ व त्यांचा परिवार यांची चौकशी ईडीचे अधिकरी करत आहेत. महंमदवादी येथील बंगल्यात स्वतः मंगलदास बांदल असून त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.शिरूर हवेलीच्या राजकारणातील एक महत्वाचा राजकीय चेहरा म्हणून बांदल यांची ओळख आहे. ईडीच्या छापेमारीमुळे बांदल पुन्हा प्रकाशझोतात येत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार ईडीने टाकलेला हा छापा शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरीही ईडीचे अधिकारी याच वेळी चौकशीसाठी गेल्याचेही ईडीच्या एका अधिकाऱ्याकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, बांदल यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणानंतर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यामुळे बांदल यांना तब्बल वीस महिने तुरुंगात राहावे लागले होते.बांदल यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ते सध्या जामीनावर तुरुंगाच्या बाहेर आहेत.