पुणे-समज (परसेप्शन) आणि वास्तव (रियालिटी) यांच्यातील लढाईत समाजाच्या मनातील आणि बुद्धीचा अंधार दूर करताना विषारी अन्न आणि विषारी विचार ही 21व्या शतकातील दोन आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी भारतीयत्वाचा विचार महत्त्वाचा असल्याचे मत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
माधव भांडारी यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘ दृष्टिकोन ‘ या राजकीय वैचारिक लेखकांच्या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रकाशक सुधाकर जोशी, मिलिंद एकबोटे यांची उपस्थिती होती.
मुनगंटीवार म्हणाले, जगाने आपल्या देशाची सहिष्णुता आणि मातीचा वैचारिक गुणधर्म ज्यात त्याग आणि सेवेची किंमत आहे आणि स्वामी पेक्षा सेवकाची पूजा केली जाते तो स्वीकारला आहे. वैचारिक भूमिकेतून हा विचार जगभर पसरला आहे. भारतीयत्वाचा हा विचार आयात करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये.
मुनगंटीवार पुढे म्हणाले माधवराव मनाचा वैचारिक विस्तार करण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहिले. मनाचा विचार पक्का असला की कितीही संकटे येऊ दे माणूस निश्चल राहतो, हे माधवरावांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी स्पष्टपणे विचार मांडले, पक्षासाठी समर्पित भावनेने काम केले. भाजपच्या विस्तारात कार्यकर्त्यांप्रमाणे वैचारिक भूमिका महत्त्वाची ठरली.
पाटील म्हणाले, माधवरावांनी घडलेल्या घटनांवर वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडली. ती भूमिका लोकांच्या पर्यंत खाली पोहोचविली. त्यातून पक्षाची भूमिका किंवा वैचारिक मते ठरत गेली.
केशव उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. जोशी यांनी स्वागत केले, माधव भांडारी यांनी प्रास्ताविक केले. हिमानी भांडारी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

