धाराशिव – बारामती लोकसभा मतदारसंघात बहिणीविरोधात बायकोला उमेदवारी देऊन चूक झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मान्य केले. आता त्यांच्या या विधानावर त्यांची लाडकी बहिण खासदार सुप्रिया सुळे यांनीही सकारात्मक साद दिली आहे. मी काय वर घेऊन जाणार आहे ? खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे. भावाने मागितला असता तर मी माझा पक्ष व चिन्हही दिले असते, असे त्या म्हणाल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी धाराशिवमध्ये तुळजापूरला पोहोचली. तिथे झालेल्या एका सभेत सुप्रिया सुळे यांनी उपरोक्त विधान केले. महायुती सरकारने भावा-बहिणीच्या नात्याची 1500 रुपये किंमत लावली आहे. भावाने मागितले असते तर मी माझा पक्ष व चिन्ह सर्वकाही देऊन टाकले असते. मी वर काय घेऊन जाणार? खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे. माझा पक्ष फुटला नाही, तर तो हिसकावून नेण्यात आला आहे, असे सु्प्रिया सुळे म्हणाल्या.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आम्ही मोठी चूक केली, अशी स्पष्ट कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी दिली होती. राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते. पण त्या बाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले आहे.सुप्रिया सुळे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्यावरही निशाणा साधला. माझे आव्हान आहे की, तू एकाही बहिणीचे पैसे परत घेऊन दाखव. त्यानंतर पाहा मी काय करते? डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीची स्क्रूटिनी होणार हे कुणालाही माहिती नव्हते. मलाही माहिती नव्हते. पण त्यांना कसे कळले? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी उपस्थित केला.महायुतीच्या सरकारने भावा-बहिणीच्या नात्याची 1500 रुपये किंमत लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पैसा बहिणीच्या ओवाळणीचा असल्याचे म्हटले आहे. पण हे पैसे ते त्यांच्या खिशातून देणार आहेत का? जीएसटी घेता, टॅक्स घेता, खते, तांदूळ, हॉटेलात जेवले तरी कर घेता, मग या योजनेचे पैसेही तुम्ही खिशातून देता का? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.लाडकी बहीण योजनेवर दोन आमदारांनी विरोधाभासी विधान केल्यानंतर सरकारमधील नेते चिडले होते. त्यामु्ळे ते जळगावात चिडून – चिडून भाषण करत होते. याचा अर्थ त्यात काहीतरी गोलमाल आहे. लाडकी बहीण योजनेला निधी कुठून आणला? काही पत्रकारांनी या योजनेचा निधी डीपीडीसीमधून वळता केल्याचा दावा केला. या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करावे. कारण ते अनेकवर्षे राज्याचे अर्थमंत्री होते, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.