: सृजनसभा प्रस्तुत कलासाधक सन्मान व संवाद कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : भारताची संस्कृती जपण्याचे कार्य शाहीर त्यांच्या कलेतून करीत आहेत. इतिहासातील अनेक गोष्टी पुस्तकातून कळत नाहीत परंतु त्या पोवाड्यातून कळतात. त्यामुळे इतिहासातून पोवाड्याचे महत्व देखील कळते. ही कला जोपासली पाहिजे असे मत एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.सृजनसभा प्रस्तुत कलासाधक सन्मान व संवाद कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळात करण्यात आले. यावेळी संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानिमित्त आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचा सन्मान करण्यात आला. सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते उपस्थित होते. अक्षदा इनामदार, होनराज मावळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आदेश वाटाडे, आर्या फडतरे, सई जोशी, अमेय जोग, प्रतीक यादव, आर्या तागडे यांचे सहकार्य लाभले केले. सन्मानपत्र, मनाचे उपरणे, पूर्ण पोशाख असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमात हेमंतराजे मावळे यांची प्रकट मुलाखत प्रसाद भारदे यांनी घेतली.
विक्रमसिंह मोहिते म्हणाले, आज कलासंस्कृती टिकवण्यासाठी राजश्रयाची गरज आहे. ही कला आपल्या कार्यातून शाहीर, त्यांचे कुटुंबीय आणि शिष्य वर्ग टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज सृजन हा शब्द केवळ कलेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात आणण्याची गरज आहे, असे ही त्यांनी सांगितले.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, आज कलाकार म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा सरकारकडून अपेक्षित सन्मान मिळत नाही. त्याचबरोबर वृध्द कलाकारांची देखील उपेक्षाच होताना दिसत आहे. म्हणून वृद्ध कलाकारांना पुणे जिल्हा मानधन निधी समितीची स्थापना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. अक्षदा इनामदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. होनराज मावळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.मृणालिनी दुसाने यांनी आभार मानले.