महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नागपुरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाळाभाऊ परिसरात छापा टाकून ड्रग्ज (एमडी) निर्मितीचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. डीआरआयच्या पथकाने चार जणांना अटक केली. या कारवाईमुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात एमडीची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. आकाश हारोडे, साहिल शेख, सुमीत घोनमोडे व दिव्यांशू अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. या कारवाईत ५२ किलो एमडीसह ७८ कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
राजस्थान, मुंबई कनेक्शन-आकाश हारोडे, साहिल शेख, सुमीत घोनमोडे व दिव्यांशू यांनी चार दिवसांपूर्वी पाचपावलीत इमारत भाड्याने घेतली. दोन दिवस त्यांनी साहित्य खरेदी केले. प्रयोगशाळा स्थापन केली. एमडी तयार करायला सुरुवात करताच डीआरआयच्या पथकाने छापा टाकला. काही महिन्यांपूर्वी राजस्थान, मुंबईमध्ये एमडीची मोठी खेप पकडण्यात आली होती.
बाळाभाऊ पेठेत चौघांनी द्रव स्वरूपातील एमडीचे रूपांतर एमडी पावडरमध्ये तयार करण्यासाठी कारखाना सुरू केला. शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास डीआरआयचे ३५ अधिकाऱ्यांचे पथक पाचपावलीत धडकले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने बाळाभाऊ पेठेतील इमारतीत छापा टाकला. पथकाने १८ तास झाडाझडती घेतली. झडतीत मेफेड्रोन निर्मितीसाठी आवश्यक असलेली रसायने, साहित्य आणि यंत्रासह प्रयोगशाळा आढळली. पथकाने येथून १०० किलोपेक्षा अधिक एमडी तयार करण्याची क्षमता असलेल्या कच्च्या मालासह ७८ कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले. डीआरआयच्या पथकाने चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. दरमयान, डीआरआयच्या पथकाने जून महिन्यात दीपक मच्छिंद्र देसाई (२७, रा. हातखोला, तासगाव, सांगली) याने १५ जून रोजी आत्महत्या केली आहे.