नागपूर दिनांक १२ ऑगस्ट
नाशिकच्या सायली वाणी हिने महिला व 19 वर्षाखालील मुली या दोन गटात विजेतेपद पटकाविले आणि द्वितीय मानांकन राज्य टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी धमाका केला. या स्पर्धेतील पुरुष गटात चिन्मय सोमय्या (टी एस टी मुंबई) तर मुलांच्या १९ वर्षाखालील गटात कुशल चोपडा (नाशिक) हे विजेतेपदाचे मानकरी ठरले.
महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने व नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे सुभेदार सभागृह येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिलांच्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकीत सायली हिने अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथा वर्टीकर हिच्यावर मात करीत सनसनाटी विजय नोंदविला. शेवटपर्यंत अटीतटीने झालेला हा सामना तिने १२-१०,११-४, ११-९, ८-११,८-११,११-७ असा जिंकताना टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. पृथा वर्टीकर हिने तिसरी व चौथी गेम घेत सामन्या मधील उत्कंठा वाढवली तथापि शेवटच्या गेम मध्ये सायली हिने सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत ही गेम घेतली आणि सामनाही जिंकला. तिने १९ वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत जेनिफर वर्गीस या स्थानिक खेळाडूचे आव्हान परतविले. हा सामना देखील अतिशय रंगतदार झाला. त्यामध्ये सायलीने ११-९,५-११,११-९,७-११, ११-६,११-८ असा विजय संपादन केला. दोन्ही खेळाडूंनी काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. मात्र निर्णायक गेममध्ये सायली हिने वर्चस्व राखले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात चिन्मय याने ठाण्याचा खेळाडू दीपित पाटील याच्यावर मात करीत विजेतेपद पटकाविले आणि आपले अव्वल मानांकन सार्थ ठरविले. हा सामना देखील शेवटपर्यंत उत्सुकतेने झाला. त्यामध्ये चिन्मय याने ११-८,८-११, ११-२,११-५,५-११,११-२ अशी बाजी जिंकली. मुलांच्या १९ वर्षाखालील गटात तृतीय मानांकित खेळाडू कुशल याने अव्वल मानांकित खेळाडू सर्वेश सामंत याला पराभूत करीत आश्चर्याचा धक्का दिला. हा सामना त्याने ११-६,९-११,११-८, ४-११,११-९,८-११,११-८ असा जिंकला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगेश मोपकर, ॲड.आशुतोष पोतनीस, संजय भेंडे, किरण गडकरी, मुकुंद कांबळे- कार्यकारी आदी मान्यवरांच्या हस्ते झाला.

