मुंबई
धाराशिव, नांदेडमध्ये मराठा आंदोलकांचा मनसे अध्यक्षांवर रोष, बीडमध्ये उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांकडून ताफ्यावर सुपाऱ्यांची उधळण झाल्याने राज ठाकरे संतापले आहेत. यामागे शरद पवार व उद्धव ठाकरे यांची फूस असल्याचा त्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ‘माझ्या नादी लागू नका. माझे मोहोळ उठले तर मी त्यांची राज्यात एकही सभा होऊ देणार नाही,’ असा धमकीवजा इशारा राज यांनी शनिवारी उद्धवसेना आणि शरद पवार गटाचे नाव न घेता दिला.
दुुपारी १ वाजता त्यांनी संभाजीनगरातून हा इशारा दिला. त्यानंतर रात्री ८ वाजता मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव यांची ‘भगवा सप्ताहा’ची सभा उधळण्याचा प्रयत्न केला. गडकरी रंगतायनमध्ये येण्यापूर्वीच उद्धव यांच्या कारवर नारळ, बांगड्या, टोमॅटो आणि शेण फेकण्यात आले. सभागृहाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी दोन्ही गटात कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. पोलिसांनी गदारोळ करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर मेळावा सुरू झाला.
वक्फच्या विधेयकावरून मुस्लिम समाजाची मातोश्रीबाहेर निदर्शने
मुस्लिम समाजाने यंदा उद्धवसेनेला मतदान करून त्यांचे ९ खासदार निवडून आणले. मात्र त्यापैकी एकानेही वक्फ बोर्डबाबत संसदेत सरकारने मांडलेल्या नव्या विधेयकाला विरोध केला नाही की त्याबद्दल अवाक्षरही काढले नाही, असा आरोप करत मुस्लिम समाजाने शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर निदर्शने केली.
राज ठाकरेंनी मिसळला भाजपच्या ‘सुरात सूर’
- शरद पवार-उद्धवांवर टीका जरांगेंच्या आडून शरद पवार व उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. काही पत्रकारही राजकारण करत आहेत. त्यापैकी कुणाला काय काय मिळाले ते मी जाहीर करून चौकशी लावणार.
- अजितदादांचे समर्थन अजित पवारांनी कधी जातीय राजकारण केले नाही. आर्थिक निकषावर आरक्षण द्या, असे मी २००६ पासून सांगतो आहे. पवार, उद्धव यांनी मराठा आरक्षणासाठी कधीही प्रामाणिक प्रयत्न केलेच नाहीत.
- फेक नॅरेटिव्ह
भाजपच्या लोकांनी संविधान बदलावर भाष्य केले. तोच मुद्दा विरोधी पक्षांनी उचलला. लोकसभेत राज्यात मतदान भाजपच्या विरोधात झाले, शरद पवार- उद्धवांच्या प्रेमापोटी नव्हे.
उद्धव मोदी, शाह, शिंदे यांच्यावर पुन्हा घसरले
- शाहांना पुन्हा ‘अब्दाली’ टोला उद्धव म्हणाले, औरंगजेबाच्या घोड्यांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतोय. महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे शिवसेना दाखवून देईल.
- एकनाथ शिंदेंवर टीका मिंधे सरकार नुसत्या घोषणा करतंय, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. ठाण्यात मिधेंचे कलेक्टर आहेत, चांडाळ चौकडी आहे. त्यांना आपण तुरुंगाचे गज मोजायला लावूयात.
- श्रीकांत शिंदेही टार्गेट कल्याणमध्ये मिधेंचे कार्टे उभे होते. तिथे शिवसैनिकाचा पराभव करण्यासाठी विश्वगुरूंना बोलवावे लागले. मुंबईमध्ये कीर्तिकरांची सीट ४८ मतांनी चोरलेली सीट आहे.

