पिंपरी, पुणे (दि. १० ऑगस्ट २०२४) शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने मागील वीस वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्या अंतर्गत यावर्षी गुरुवारी (दि.१५) दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
१५ ऑगस्ट, सकाळी १० वाजता, पिंपळे निलख येथील मुख्य बस स्टॉप चौकात, मनपा शाळेसमोर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आदींच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी बारावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार आणि रोख रक्कम पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दहावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय सुरज काळुराम नानगुडे स्मृती पुरस्कार रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, स्कूल बॅग आणि सन्मानचिन्ह तसेच इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.