पुणे, ता. १०: सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमच्या वतीने प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेहवाल हिला सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तिला या पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांना देण्यात आला होता.
नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया व मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्या हस्ते सायना नेहवाल हिला सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सायना नेहवाल म्हणाली, “हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप सन्मान वाटतो. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने घेतलेला पुढाकार खरोखरच प्रशंसनीय आहे. पुढच्या पिढ्यांना उत्कृष्टतेकडे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.”
दृढनिश्चय व कठोर परिश्रम याला कधीही कमी लेखू नका. यश हेच अंतिम ध्येय नसून, जीवनात येणारी आव्हाने व संधी याचा प्रवास आहे. प्रत्येक आव्हानाला आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी एक पायरी म्हणून स्वीकारा. तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण ही शिकण्याची, प्रगती करण्याची आणि अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे स्वतःवर, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, असा संदेश तिने विद्यार्थ्यांना दिला.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “कठोर मेहनत, दृढनिश्चय आणि जिद्द या मूल्यांना आत्मसात करावे. कारण याच गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि आपल्या स्वप्नांची पूर्ती होण्यासाठी प्रेरक ठरतात. सायना नेहवाल हीचा प्रेरणादायी प्रवास समजून घेत तिच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या प्रयत्नांना यशाकडे न्यावे.”