पुणे : कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व पुण्याचे पॅडमॅन असलेल्या योगेश पवार यांच्या पुढाकारातून दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा पुरस्कार सोहळ्याचे १६ वे वर्षे होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते अभिनेता समीर चौघुले, हार्दिक जोशी, चिन्मय उदगीरकर, हर्षद आतकरी, योगेश शिरसाट, मिलिंद शिंत्रे, अभिनेत्री सुरुची अडारकर-रानडे आणि आरजे संग्राम यांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी सीमेवर लढताना अपंगत्व आलेले भारतीय लष्करातील जवान सदाशिव घाडगे यांनाही सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, कार्यक्रम संचालक पूजा वाघ, अलवीरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे, प्रिया कोसुबकर आदी उपस्थित होते. चित्रपट, फॅशन, उद्योग, वैद्यकीय, पत्रकारिता, शिक्षण, समाजकार्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले. कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्कार ‘सूर्यदत्त’च्या सुषमा चोरडिया यांना प्रदान करण्यात आला.
सुषमा चोरडिया यांचा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सूर्यदत्त’च्या स्थापनेपासून संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. प्रशासन, वित्त, शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन आदी जबाबदाऱ्या त्या समर्थपणे सांभाळत आहेत. सर्वांना दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा सर्वांगीण विकास यावर त्यांचा अधिक भर आहे. परोपकारी आणि सामाजिक व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. महिला सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित मॉड्यूल्स, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, जीवन कौशल्य प्रशिक्षण, जागरूकता कार्यक्रम आणि समाजातील गरजू, पात्र व आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गाला शिक्षण देण्याचे काम करत असलेल्या ‘सूर्यदत्त वुमेन एम्पॉवरमेंट अँड लीडरशिप अकॅडमीच्या (स्वेला)’ त्या अध्यक्षा आहेत.
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली आहे. नुकताच त्यांना लंडन येथे ‘मोस्ट प्रॉमिसिंग सोशल चेंजमेकर अँड एज्युकेशनिस्ट २०२३’ हा पुरस्कार मिळाला आहे. नवभारत एज्युकेशन अवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्कार, ग्लोबल सोशल आंत्रप्रेन्युअर, वूमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट आयकॉन इन एशिया २०२२, महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२३, द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड २०२१ यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कशिश सोशल फाउंडेशनचे वतीने सोहळ्याच्या निमित्ताने महिलांना ३६०० सॅनिटरी पॅड्स चे या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमासाठी तसेच सैनिकी कल्याण उपक्रमासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने संस्थापक व अध्यक्ष प्रा डॉ संजय बी चोरडिया यांच्या हस्ते देणगी देण्यात आली.
महिलांचा आत्मसन्मान वाढविणाऱ्या, त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र करणाऱ्या तसेच त्यांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक उपक्रमांना सूर्यदत्त स्थापनेपासूनच चालना देत आहे. सूर्यदत्तच्या व्होकेशनल कोर्सेस, तसेच फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाईन, नर्सिंग, इव्हेंट मॅनेजमेंट अशा कोर्सेस मधून महिलांना सक्षम करण्याचा, त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न संस्था करत आहे, असे प्रा डॉ संजय बी चोरडिया या प्रसंगी म्हणाले.