पुणे : स्वर व लयीने कलाकाराची एकाग्रता सिद्ध होते. संगीताने चित्त स्थिर आणि त्यातून चित्तवृत्ती स्थिर होते. चित्तवृत्ती स्थिर होऊन समाजातील गुन्हे कमी होण्यास सहाय्य मिळेल. गायन, वादन, नृत्य हे संगीताशी निगडीत विविध प्रकार आहेत. त्यामुळे समाजातील गुन्हे कमी होण्याचे संगीत हे प्रमुख माध्यम असल्याचे मत ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. सुरेश तळवळकर यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे आयोजित म्हसोबा उत्सवांतर्गत गणेश कला क्रीडा मंच येथे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, आमदार माधुरी मिसाळ, खारवडे देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके-मारणे, उद्योजक अभय लुणावत, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रिती कांबळे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.
यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार उद्योग भूषण पुरस्कार आर. के.लुंकड हौसिंग कॉर्पोरेशनचे संचालक रमनशेठ लुंकड, कला भूषण पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार व गायक शौनक अभिषेकी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांना प्रदान करण्यात आला. डॉ. भावार्थ देखणे, सम्राट फडणीस यांचा पुरस्कार त्यांच्यातर्फे आलेल्या प्रतिनिधींनी स्विकारला. याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची व पोलीस गणेश गाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र, फळांची परडी असे पुरस्काराचे स्वरुप होते.
पं. विजय घाटे म्हणाले, तबला वादन हे ऐकायचे असते. दृश्य स्वरुपात हे सादरीकरण नसते. त्यामुळे त्याची प्रगल्भता सामान्यांना समजत नाही. त्याकरिता ती कला शिकणे आवश्यक आहे. पुरस्काराला उत्तर देताना पं. शौनक अभिषेकी म्हणाले, अभिषेकी घराण्यातील माझ्यासारख्या विद्यार्थ्याला पुरस्कार दिल्याचा आनंद आहे. ट्रस्टने आमच्यासारख्या कलाकारांची पुरस्काराच्या माध्यमातून कदर केली असून जो कलाकाराची कदर करतो, तो समाज प्रगतीशील होतो.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, आपल्यासारख्या महिलांना घरुन प्रोत्साहन मिळेल, अशा कालखंडात आपण जन्माला आलो. त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा महिलांनी घ्यायला हवा. प्रत्येक स्त्रीमध्ये सामर्थ्य आहे. पण ते प्रत्येकीने ओळखायला हवे. प्रत्येक मातेने स्वराज्य आणि स्वसामर्थ्य हा मंत्र जपला, तर घराघरांत छत्रपती शिवाजी महाराज घडू शकतील, असेही त्यांनी सांगितले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.
समाजातील गुन्हे कमी होण्याचे संगीत हे प्रमुख माध्यम
Date:

