पुणे -कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५२६ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. पुण्यात चार ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना रक्तदात्यांनी शिबिरात येऊन आपले रक्तदानाचे पवित्र कर्तव्य निभावले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरसंघचालक रज्जूभैया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्वती, सिंहगड, कात्रज आणि कसबा या भागांच्या मदतीने चार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जनकल्याण रक्तकेंद्र पुणे आणि नगर तसेच सोलापूर येथील डॉ. हेडगेवार रक्त केद्रांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
सततचा पाऊस, त्यामुळे पुण्यातील रुग्णांची वाढलेली संख्या आणि त्यासाठी वाढलेली रक्ताची मागणी या पार्श्वभूमीवर रक्त संकलन वाढत नव्हते. या पार्श्वभूमीवर ही शिबिरे झाल्यामुळे त्यात झालेले रक्त संकलन निश्चितच मोलाचे आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेऊन सध्या पुण्यामध्ये असलेला तुटवडा दूर करायला मदत केली. त्याबद्दल आपले विशेष धन्यवाद, अशी प्रतिक्रिया जनकल्याण रक्तकेंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
कसबा भागाच्या शिबिरात डॉ. प्रशांत बोधे,बोरा फुड्सचे संचालक सतीश बोरा आणि अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्वती भागाच्या शिबिरात डॉ. सचिन केदार, तर कात्रज भागाच्या शिबिरात प्रसिद्ध उद्योजक ब्रिजेशभाई पटेल आणि भाग्योदय ग्रुपचे संचालक विक्रांतजी सेटिया यांची प्रमुख उपस्थिती होती. सेटिया यांनी उद्घाटनप्रसंगी रक्तदान केले. सिंहगड भागाच्या शिबिरात डॉ. नितीन पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपात सर्व रक्तदाते आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांप्रती कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी कृतज्ञता व्यक्त केली.