पुणे- समृध्द भारत ट्रेडिंग सर्व्हिस(ब ६०९ / सिटी व्हिस्टा, खराडी ) या कंपनीत गुंतवणूक केल्यास 20 महिन्यांत रक्कम दुप्पट करुन देताे असे आमिष दाखवत १९ जणांना ७२ लाख ७४ हजार १५८ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी राजेश गाेरख यादव (वय-४०,रा. खेंगरेवाडी, ता.पुरंदर,पुणे) यांनी 6 आराेपींविराेधात चंदननगर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार नरेंद्र बाळु पवार (वय-४१,रा.मालेगाव, नाशिक), माजी सैनिक गणेश माळवदे (वय-४२,रा. छत्रपती संभाजीनगर), प्रफुल कांबळे (४०,रा.पुणे), शुभांगी पवार (वय-३६,रा.मालेगाव, नाशिक), स्वप्नील ठाकरे (३८,रा.मुंबई), संदीप मुळे (३८,रा.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहेत. सदर प्रकार सन २०२३ ते २१/४/२०२४ यादरम्यान घडला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आराेपींनी संगनमत करुन चांगल्या पध्दतीने परतावा देताे म्हणून गुंतवणूक केलेली रक्कम २० महिन्यांत डबल करुन देताे असे सांगितले. मुळ गुंतवणुकीच्या १० टक्के रक्कम दरमहा परत करु असे आश्वासन देवून, वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार आयाेजित करुन, लाेकांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या ट्रेडिंग कंपनीत आर्थिक गुंतवणुक करण्यास सांगितले.
आरोपींनी अतिशय नियाेजनबध्द पध्दतीने तक्रारदार व इतर १८ लाेकांची मिळून एकूण ७२ लाख ७४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत पुढील तपास चंदननगर पाेलीस करत आहेत.

