सोलापूर- महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे मुळातच महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीये असे भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.मराठाच काय जात पात सोडा आणि भूमिपुत्रांना शिक्षण आणि नौकऱ्या द्या अशी भूमिका त्यांनी विशद केली तसेच भाजपला पाठिंबा लोकसभे पुरताच दिला असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी राज्यात पेटलेल्या मराठा- ओबीसी वादावर राज ठाकरे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. ते म्हणाले, ”या महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की तिथे आरक्षणाची गरजच नाही. पुणे, नागपूर अशा ठिकाणी फ्लायओव्हर वैगेरे सुविधा का होतात? मुळच्या लोकांसाठी नाही होत. बाहेरुन आलेल्या लोकांसाठी होतात. ठाणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे जिथे 7 ते 8 महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरुन येणाऱ्यांचा लोंढा खूप मोठा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही. यूपी बिहारला नोकऱ्यांच्या जाहिराती येतात पण महाराष्ट्रातील रोजगाराकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गेली अनेक वर्षे असेच सुरू आहे. आता बेरोजगारांची यादी येत नाही. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. सर्वात आधी इथल्या मुलांना प्राधान्य द्या”, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
तसेच याबाबत बोलतांना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया दिली. ”महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठं. महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे. हे बघणंही गरजेचं आहे. मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे फक्त मतांचे राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही”, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता विधानसभेत त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलतांना ते म्हणाले, ”मी भाजपाला पाठिंबा दिला, तो केवळ लोकसभेसाठी होता. त्यावेळी मी विधानसभेचे काही बोललो नव्हतो. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवेन, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
जात पात सोडा, भूमिपुत्रांना शिक्षण,नौकऱ्या द्या -मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची स्पष्टोक्ती
Date:

