पुणे- शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. ऐन गटारीच्या दिवशीच कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपची तोडफोड केली आहे. शहरातील कॅम्प परिसरात रविवारी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अचानक दोन ते तीन तरुण रात्रीच्या वेळी कोयत्याने दुकानाची तोडफोड करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या दुकानात ग्राहकांची गर्दी होती. मात्र अचानक या टोळक्याकडून हल्ला झाल्याने सर्व ग्राहक घाबरून तिथून निघून गेले. कोयत्याने तोडफोड केल्यानंतर या टोळक्याने दुकानावर दगडफेक केल्याचेही दिसून येत आहे. मात्र कोणीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क वाईन शॉप असे दुकानाचे नाव आहे. कॅम्प परिसरातील घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

