पुणे- प्रौढांची एव्हरग्रीन चषक दुसरी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील सांघिक विभागात डेक्कन जिमखाना क्लबच्या ‘अ’ आणि ‘ब’ या दोन्ही संघांनी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.
ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त मान्यतेने सुरू आहे. या स्पर्धेतील सामने डेक्कन जिमखाना क्लब येथील दहा टेबल्सवर तसेच सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर येथील पाच टेबल्स वर आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेतील सांघिक विभागात डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाने एमबीपीए संघाचा ३-२ असा पराभव केला. त्यावेळी त्यांच्याकडून सुयश कुंटे, अमित ढेकणे आदित्य गर्दे यांनी शानदार खेळ केला. जिमखाना ‘ब’ संघाने सोलापूर ‘ब’ संघाचा ३-० असा पराभव केला, त्याचे श्रेय सागर शहा, संतोष मदीकुंट व शंतनु जोशी यांना द्यावे लागेल.
अन्य सामन्यांत टॉस अकादमी संघाने करिअर इलेव्हनचा ३-० असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामध्ये संतोष वाकराडकर, कृपाल देशपांडे व दीपेश अभ्यंकर या अनुभवी खेळाडूंचा सिंहाचा वाटा होता. काउंटर अटॅक संघाने सिद्धांचल संघाला ३-० असे पराभूत केले त्यावेळी त्यांच्याकडून नितीन कुलकर्णी, नहुश दांडेकर व विवेक फडणीस हे चमकले. ड्रीम टीम संघाने देखील अपराजित्व राखताना स्मार्ट मास्टर्स संघाला ३-२ असे हरविले.
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समितीचे अध्यक्ष राजीव बोडस यांच्या हस्ते झाले यावेळी सन्मय परांजपे, स्मिता बोडस श्रीकांत अंतुरकर,मनीषा बोडस, श्रुती परांजपे मिहिर केळकर, गिरीश इनामदार, आशिष बोडस हे उपस्थित होते.

