पुणे, दि. ०४ ऑगस्ट २०२४: संततधार पाऊस व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुणे, पिंपरी शहर तसेच खेड, मावळ व आंबेगाव तालुक्यातील सुमारे ३०५० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करून ठेवण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीपात्राच्या परिसरातील डेक्कनमधील पुलाची वाडी व प्रेमनगरातील १००, सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील ७ सोसायट्यांचे ४५०, बालेवाडीमध्ये भीमनगरातील १००, विश्रांतवाडीमध्ये शांतीनगर व इंदिरानगरातील ४००, मंगळवार पेठमध्ये जुना बाजार परिसरातील ४५० तसेच ताडीवाला रोड परिसरातील ४५० अशा अशा सुमारे १९५० वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर पिंपरीमध्ये संजय गांधीनगर व पिंपरी कॅम्पमध्ये ४०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
तसेच वीजयंत्रणा पुराच्या पाण्यात गेल्याने मावळ तालुक्यातील वडिवळे, वळख, बुधावाडी, सांगिसे, नेसावे, खांडशी आणि खेड तालुक्यातील साकुर्डी, कहू, वेताळे, सायगाव कोठुळे येथील सुमारे ७०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तर आंबेगाव तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंचाळे खुर्द व वचपे या गावामध्ये भूस्खलन होत आहे. तेथील नागरिकांचा स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वीजसुरक्षेच्या दृष्टीने तेथील सुमारे १५ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.