मुंबई-सचिन वाझे नार्को टेस्टला तयार आहेत , त्याप्रमाणे अनिल देशमुखांनीही टेस्ट देतो असे म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशमुखांना जाहीर आव्हान दिले आहे. . फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी त्यांनी नार्को टेस्ट दिली पाहिजे असा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे. दरम्यान, आज प्रसार माध्यमांशी बोलतांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासनाकडे सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा असे ते म्हणालेत. त्यानंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
ते म्हणाले, एखाद्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर दुसऱ्यांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुख यांनीही नार्को टेस्टला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. त्यानंतर वाझेंनी केलेले आरोप खरे की खोटे हे जनतेसमोर सिद्ध होईल. वाझे यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे देशमुख म्हणतात. मग त्यांनी इतरांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नार्को टेस्ट द्यावी”, असे बावनकुळे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण केल्यानंतर महाराष्ट्राची जनता माफ करत नाही. त्यामुळे या आरोपांवर देशमुखांनी तातडीने चौकशीची मागणी करून या प्रकरणातून मुक्त झाले पाहिजे. आरोप- प्रत्यारोप करून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पुसले जाणार नाहीत. सार्वजनिक जीवनात परीक्षांना सामोरे गेले पाहिजे”, असा सल्ला बावनकुळेंनी दिला आहे.
दरम्यान, मला क्लीन चिट दिल्याने फडणवीसांनी तो अहवाल लपवून ठेवल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे. ते म्हणाले, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा 1400 पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे 2 वर्षापुर्वी सादर केला आहे. परंतु दोन वर्षांपासून तो अहवाल जनते समोर आणला जात नाहीये. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सार्वजनीक करण्यासाठी विनंती केली. दोन वर्षापूर्वी हा अहवाल राज्य शासनाला सादर झाला त्यावेळी सर्वच वर्तमान पत्रामध्ये अनिल देशमुख यांना न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या अहवालात “क्लीन चिट दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या अहवालात मला “क्लिन चिट” दिल्यामुळे तो देवेंद्र फडणवीस यांनी दडवून ठेवला आहे, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.पुढे अनिल देशमुख म्हणाले, दहशवादी व दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर जुनाच 3 वर्षांपूर्वीचा आरोप केला आहे. काल सांगीतल्याप्रमाणे मला जामीन देताना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगीतले की, सचिन वाझे हा 2 खुनाच्या गुन्हाच्या आरोपात असल्यामुळे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासना सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा”, असे आवाहनही अनिल देशमुख यांनी केले.

