मुंबई-शनिवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यांच्या भेटीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलिस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह आधी विषयांवर चर्चा झाली. ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या आठवड्यातील ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आज मुख्यमंत्री शिंदे यांची पाठोपाठ दोन बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. खासदार शरद पवार या भेटीत मराठा आरक्षणासह राज्यातील अन्य विषयावर चर्चा केली किंवा कसे ते समजू शकलेले नाही .
शरद पवार दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी दाखल झाले . या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या आठवड्याभरात ही दुसरी भेट आहे. या आधी 22 जुलैला दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती.
शरद पवार यांनी 22 जुलै दिवशी घेतलेल्या भेटीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय होता. यासोबतच दूध दराचाही प्रश्न, विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देणे हा विषय होता. शरद पवार मुख्यमंत्री भेटीत कुणाच्या ही कारखान्यावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले होते. तर आजच्या भेटीचे कारण अद्याप समजलेले नाही.

