देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिल्याचा दावा
मुंबई -अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. मी त्यांच्या पीएकडे पैसे देत होतो या बद्दल सर्व माहिती मी फडणवीसांना पत्र लिहून दिली असे वाझे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. वाझे यांचे हे पत्र अद्याप समोर आलेली नाही. मात्र एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतांना त्यांनी माझ्याकडे अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असल्याचा आरोप केला आहे.
तुरुंगातून वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतांना सचिन वाझे म्हणाले, ”जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) यांच्या पीएमार्फत घेतले जात होते, सीबीआयकडेही तसे पुरावे आहेत आणि मी एक पत्रही लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत”, असा दावा सचिन वाझे यांनी केला आहे. दरम्यान, तुरुंगातून सचिन वाझे यांनी प्रथमच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण आता तापण्याची शक्यता आहे.
फडणवीसांना लिहलेल्या पत्रात जयंत पाटलांचेही घेतले नाव
वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचे देखील नाव असल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अनिल देशमुख हे अत्यंत भ्रष्टाचारी गृहमंत्री होते हे सिद्ध झालेले आहे. अनिल देशमुख जामिनावर बाहेर आहेत. मात्र फडणवीसांना लक्ष करत त्यांना बदनाम करणे हेच उद्धव ठाकरे गॅंगचे सर्वात मोठे उद्दिष्ट्य राहिलेले आहे. त्या माध्यमातूनच अनिल देशमुख हे फडणवीसांवर आरोप करत आहेत. त्यांना स्वतःचे थोबाड फोडून घ्यायची हौस आहे”, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाकीट देऊन पाठवले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार यांना अडकवण्यासाठी सांगण्यात आले होते”, असे गंभीर आरोप त्यांनी केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. हे प्रकरण थंड होत नाही तोच आता सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.