पुणे, २ ऑगस्टः ” देशातील प्रत्येक शाळा क्रांति मंदिर व्हावी. देशातील ३० कोटी युवकांमधून ३ कोटी मुले मोठी होऊन देशाचे नाव उज्ज्वल करतील तर हा देश मोठा होईल. यासाठी अशा क्रांतिकारकांच्या प्रदर्शनीचे आयोजन अत्यंत महत्वाचे आहे.” असे विचार भाषा तज्ज्ञ संदीप नुलकर यांनी व्यक्त केले.
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने प्रणित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेतर्फे ‘ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर’ असे ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत २ हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सर्वांसाठी मोफत असे हे प्रदर्शन २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात २ हजार ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ७५ फोटो वेगवेगळ्या माध्यमांच्या आकारातून साकार करण्यात आले आहेत.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे, समाजसेवक जयंत जेस्ते, कॅप्टन परशुराम शिंदे माजी सेनाधिकारी , भोसले, वीर पत्नी व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने उपस्थित होते.
संदीप नूलकर म्हणाले,” या देशाला मोठे करण्यासाठी मुलांच्या मनावर अशा क्रांतिकारकांचे विचार बिंबवणे गरजेचे आहे. यामुळे मुलांच्या पालकांना त्यांचा अभिमान वाटेल.”
अभय भोर म्हणाले,” क्रांतिकारकांनी आपले बलिदान देऊन देशाला ‘सुजलाम सुफलाम’ बनविले आहे. परंतू कित्येक विद्यार्थ्यांना किंवा जनतेला २ हजार क्रांतिकारकांचा परिचय नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी पुणे व पिंपरी चिंचवड येथील मेट्रो स्टेशन व मेट्रोमध्ये क्रांतिकारकांची प्रदर्शनचे आयोजन करण्याचा प्रयत्न करतो.”
चंद्रकांत शहासने म्हणाले, ” २ हजार क्रांतिकारांची माहिती देणारे हे देशातील एकमेव प्रदर्शन आहे. त्यामुळे आम्ही ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करतोय, आतापर्यंत १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व क्रांतिकारांची माहिती पोहचविली आहे.”
चंद्रलेखा बेलसरे यांनी, देशात वैचारिक क्रांतीची गरज असून क्रांतिकारांचे बलिदान वाया जाऊ नये यासाठी मुलांमध्ये क्रांती जागृत करण्याचा सल्ला दिला. ज्ञात व अज्ञात अशा क्रांतिकारकांची माहिती देणारी ही प्रदर्शनी असल्याची माहिती समाजसेवक जयंत जेस्ते यांनी दिली.
वंदे मातरम् गीताचे संशोधक श्री.मिलिंद सबनीस यांनी देशाचे भविष्य उज्ज्वल असून हा देश संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणार आहे असे सांगितले.त्यानंतर कॅप्टन परशुराम शिंदे यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी वीरमाता, वीरकन्या, वीरपुत्र व सेनादलातील माजी सैनिक योद्धे यांचा अष्टविनायक गृपचे बाफणा व कार्यकर्ते तसेच पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल व रमणबाग प्रशालाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना विश्वस्त ऍड. नंदिनी शहासने यांनी सांगितले की इतिहासाच्या कोनशिलेवर भविष्याचा इमला बनतो. संयोजिका तेजाली शहासने यांनी उत्तम संयोजन केले व आभार व्यक्त केले.

