पुणे, दि. ०२ ऑगस्ट २०२४: महापारेषणच्या चाकण येथील ४००/२२ केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रात शुक्रवारी (दि. २) सकाळी १० च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकणमधील कुरुळी, नानेकरवाडी, खालुंब्रे, म्हाळुंगे, निघोजे परिसरातील ६ हजार ९५० घरगुती, वाणिज्यिक तसेच लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी ४ वाजेपर्यंत खंडित होता.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण येथील ४००/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात सकाळी १० च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. परिणामी ५० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे महावितरणच्या २२ केव्हीच्या सहा वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. यातील दोन वीजवाहिन्यांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे सुमारे ३० मेगावॅटची तूट निर्माण झाल्यामुळे नानेकरवाडी, कुरुळी, खालुंब्रे व सारा सिटी २२ केव्ही वाहिन्यांवरील ५ हजार ५०० घरगुती व वाणिज्यिक तसेच १२०० लघुदाब व २५० उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुरुस्ती काम पूर्ण होईपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागला.