परभणी-अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? गाड्या फोडायच्याच असतील तर शरद पवार, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्यांच्या फोडा, असे प्रक्षोभक विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित सभेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या दोन्ही घटनांमुळे राज्याचे राजकारण तापले असताना आरक्षण बचाव यात्रेवर असणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी उपरोक्त विधान केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे, तर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. त्यांच्या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे की, अशा चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? तुम्हाला गाड्या फोडायच्याच असतील तर मी तुम्हाला 4 माणसांची नावे देतो. तुम्ही त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या गाड्या फोडा.
प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना हल्ला झाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार पोलिसांनी अंकुश कदम व धनंजय जाधव या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंवर तिखट शब्दांत टीका केली होती. विशाळगडावरील हिंसाचाराला संभाजीराजे जबाबदार आहेत. ते छत्रपतींसारखे वागले नाहीत. ते शाहू महाराजांचे सुपुत्र आहेत का? याविषयी मला शंका आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे संभाजीराजे यांचे समर्थक संतापले होते. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना धडा शिकवण्याचाही इशारा दिला होता. त्यानुसार पोलिसांनी आव्हाडांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला होता.