पुणे, दि. ०२ ऑगस्ट २०२४: महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ८५ लाख ७७ हजार ४४२ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना २२६ कोटी ५२ लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ८५ लाख ७७ हजार ४४२ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना २२६ कोटी ५२ लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील ४२ लाख ९९ हजार ७१५ ग्राहकांना १४८ कोटी ६१ लाख रुपये, सातारा जिल्हयात १० लाख २७ हजार ४२५ वीजग्राहकांना १८ कोटी ८७ लाख, सोलापूर जिल्ह्यात ११ लाख ८०६ ग्राहकांना २० कोटी ५ लाख, सांगली जिल्ह्यात ९ लाख ३७ हजार ५७० ग्राहकांना १४ कोटी ३१ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात १२ लाख ११ हजार ९२६ ग्राहकांना २४ कोटी ६८ लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.
वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लघुदाब वीजग्राहकांना फरकाची अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.