नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन:कोथरुड मध्ये चर्मकार समाजाचा मेळावा
पुणे:समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सेवा हाच आमुचा ध्यास असून, त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून कोथरूड मधील वेगवेगळ्या घटकांसाठी सेवा कार्य सुरू आहे, असं प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती हा राज्याचा कॅबिनेट मंत्री, प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपातच होऊ शकतं, असंही ते यावेळी म्हणाले.
भारतीय जनता पक्ष दक्षिण कोथरुड मंडलाच्या वतीने चर्मकार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गटई कारागिरांना मोफत मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र खैरे, प्रसिद्ध उद्योजक महेश तावरे, निवृत्त सनदी अधिकारी वसंत सोनावणे, भाजपा प्रदेश सचिव वर्षा डहाळे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस प्रा. डॉ. अनुराधा एडके, गिरीश खत्री, दीपक पवार, निवडणूक सह समन्वय नवनाथ जाधव, माजी नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, कार्यक्रमाचे संयोजक निलेश सोनावणे, अमर वाघमारे, आशुतोष वैशंपायन यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांना ज्या गोष्टी आवश्यक असतात; त्या उपलब्ध करून आपण प्रयत्नशील नेहमीच असतो. समाजसेवेचे व्रत अंगिकारताना आम्ही त्याच उद्देशाने कार्य करत असतो. संघाच्या शिकवणीनुसारच कोथरुड मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी अनेक सेवा उपक्रम सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या पक्षात सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला; त्याच्या कर्तुत्वानुसार स्थान मिळते. माझे आई-वडील दोघेही गिरणी कामगार होते. मात्र, मला आज वेगवेगळ्या खात्यांचा मंत्री म्हणून राज्यात काम करण्याची संधी मिळाली. तसेच, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता आलं. या माध्यमातून एकप्रकारे जनतेचे प्रश्न सोडविता आले, असे ही ते यावेळी म्हणाले.
चर्मकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खैरे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाला लाभ झाला. आर्टी सारख्या संस्थेमुळे समाजाला मोठा लाभ होणार आहे. पुणे शहरात चर्मकार समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे शहरात चर्मकार समाजाचे संत रोहिदास महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, समाजाच्या मागण्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण होतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप प्रदेश सचिव ॲड. वर्षाताई डहाळे, डॉ संदीप बुटाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर वाघमारे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनुराधा एडके यांनी केले.