रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार
- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात सविस्तर चर्चा
- वैष्णव यांनी मोहोळ यांना दिली नियोजनाची सविस्तर माहिती
नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी
रेल्वेच्या पुणे आणि विभागातील विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावतानाच पुण्यातून वंदे भारत ट्रेन सुरु कराव्यात, यावर सकारात्मक चर्चा झाली. विशेष म्हणजे वैष्णव यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात प्रत्यक्ष नकाशावर सविस्तर माहिती दिली.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेचे अनेक विषय गेली काही वर्षे प्रलंबित आहेत. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पुढाकार घेतला आहे. प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याने हे विषय लवकरच मार्गी लागणार आहेत.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व विषयांवर वैष्णव यांनी सविस्तर माहिती तर दिलीच, शिवाय आगामी काळातील कृती आराखड्याबाबतही चर्चा केली’
विशेष म्हणजे गुरुवारी लोकसभेतील भाषणात रेल्वेमंत्र्यांनी देशातील महत्वाच्या महानगरांना जोडणारी वंदे भारत मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. या अनुषंगाने पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या महानगरांसाठी वंदे भारत मेट्रोचा विचार व्हावा, या संदर्भातही चर्चा केली’, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.