सरकारची झोप राहुल गांधींनी उडवली
संजय राऊत म्हणाले, ”काहीही होऊ शकते. उद्या राहुल गांधींवर हल्लाही होऊ शकतो, आमच्यावर हल्ला होऊ शकतो. मोदी आणि अमित शहा यांना राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने सळो की पळो करून सोडले आहे. या सरकारची झोप राहुल गांधींनी उडवली आहे. मात्र तरीही गुंडांची मदत घेऊन आमच्यावर हल्ला होऊ शकतो”, असा आरोप राऊतांनी केला आहे.
मुंबई- राहुल गांधींनी लोकसभेत सरकारला आरसा दाखवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो असे खळबळजनक विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर हल्ल्याचा कट रचला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करत एक मोठा दावा केला आहे. ईडीच्या एका आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर (राहुल गांधी) छापेमारी होऊ शकते असे राहुल गांधी म्हणाले. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊतांनी यावर भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ”राहुल गांधी हे लोकशाहीचा आवाज लोकसभेत बुलंद करत आहेत. राहुल गांधींनी सरकारला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. राहुल गांधींना पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल, आम्ही तयार आहोत. भाजपाने बहुमत गमावलं आहे तरीही घटनाबाह्य कामं करण्याचे व्यसन काही त्यांचे सुटत नाही असे दिसत आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या आम्हा सगळ्यांच्या विरोधात एक कट रचला जातो आहे. हा कट इथे नाही तर परदेशात शिजतो आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

