मंगळवारी भाऊसाहेब भोईर यांची प्रकट मुलाखत
पिंपरी, पुणे (दि. १ ऑगस्ट २०२४) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (३ ऑगस्ट) पासून मंगळवार (दि.६ ऑगस्ट) पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देण्यात भाऊसाहेब भोईर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत शहराच्या वेगवेगळ्या भागात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने गुरूवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या सांस्कृतिक कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बरोबरीने पहिल्यांदाच शहरात खान्देशी, अहिराणी, राजस्थानी, बंगाली आणि दाक्षिणात्य भाषांधले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. या सर्व कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संतोष पाटील, सुदाम परब, हर्षवर्धन भोईर, गौरी लोंढे, श्वास जोशी, राहुल भोईर, किरण येवलेकर, संतोष राणे, हिम्मत माही, विशाल रामावत, रमेश गेहलोत, श्याम सुवर्णा, बंडू सावंत, राजू बंग, आसाराम कसबे, अमित मंडल, अलोक सेन गुप्ता, बि. के. चॅटर्जी, विवेक क्षीरसागर, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत शनिवारी ३ ऑगस्टला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘बाघमाऱ्या’ या खान्देशी ऐरणी या नाटकाचा प्रयोग संध्याकाळी ५ वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर रात्री ९ वाजता ‘एक शाम भोलेनाथ के नाम’ हा राजस्थानी भजन संध्येचा कार्यक्रम होईल.
रविवारी ४ ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता प्रख्यात बंगाली गायिका लोपामुद्रा यांचा बंगाली गाण्यांचा ऑर्केस्ट्रा तर संध्याकाळी ५.३० वाजता ‘ए रात्रेग पगेल्गु यानु’ हा दक्षिण भारतीय ‘तुल्लू’ भाषिक नाटकाचा प्रयोग होईल. हे दोन्ही कार्यक्रम चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहेत.
सोमवारी ५ ऑगस्ट, दुपारी १२.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मध्ये खास महिलांसाठी ‘अहो नादच खुळा’ हा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. तर संध्याकाळी ६ वाजता वाकड, काळा खडक येथील चंद्र माऊली मंगल कार्यालयात महिलांसाठी मधुसूदन ओझा यांचा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होईल.
तर, मंगळवारी (दि. ६ ऑगस्ट) सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात दुपारी १२.३० वाजता ‘शिवतांडव’ या मराठी नाटकाचा प्रयोग होणार आहे.
मंगळवारी (दि.६ ऑगस्ट ) चिंचवड प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संध्याकाळी ६ वाजता भाऊसाहेब भोईर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यानंतर प्रशांत साळवी यांचा ‘द एवर ग्रीन किशोर कुमार’ हा हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे.