पुणे(prabindia)- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच सत्ताधारी महायुती सरकारकडून देखील विविध लोकाभिमुख योजनांची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तब्बल 270 कोटींची तरतुदीकरून त्याबाबत शासन निर्णय परिपत्रक आज जारी केलेले आहे. लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा गाजावाजा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्याचा निर्णय कितपत लाभदायक ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.
सामान्य प्रशासन विभागाकडून सन २०२४-२5 या आर्थिक वर्षात (जुलै ते मार्च या कालावधीत) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी माध्यम आराखडा तयार करण्यास व त्यासाठी येणाऱ्या रु. २७० कोटी ०५ लक्ष इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन निर्णय सांकेतांक क्रमांक 202407291500404407 दिनांक 29-07-2024 रोजी जारी केलेला आहे. विविध लोकाभिमुख योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये मुख्यमंत्री-बहिण लाडकी योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आदी विविध योजनांचा समावेश असून या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी प्रचार मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्य सरकारकडून 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविली जात असून विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी या महत्वाकांक्षी मोहिमेत आहे. आगामी ६ महिन्यांच्या कालावधीत २७० कोटी खर्च करताना निवडणूक आचारसंहितेचे २ महिने वगळता उर्वरित कालावधीत प्रसिध्दी मोहिमेवर खर्चाची उधळपट्टी होणार आहे. अर्थातच निवडणूकपूर्वीच अंदाजित खर्चाचे बजेट संपुष्टात येऊ शकते. मुख्यमंत्री-बहिण लाडकी योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याचा अजून लाभार्थ्यांना लाभ प्रत्यक्षात मिळणे बाकी असतानाच राज्य सरकारकडून 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविली जात आहे त्यामुळे आगाऊ प्रसिद्धीचा नकारात्मक परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
राज्य सरकारच्या योजनांची माहिती जाहिराती मेट्रो व महानगर सार्वजिक बस स्थानक, रिक्षांवर लवकरच झळकणार आहेत. विशेष प्रसिद्धी अभियानांतर्गत वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडिओ, बाह्य व इतर माध्यमे, सोशल मीडिया, डिजिटल माध्यमांसह विविध नवीन माध्यमांद्वारे शासकीय योजनांची माहिती व जनजागृती केली जाणार आहे. योजनांची माहिती व जनजागृती करण्यासाठी अंदाजित खर्चाचा माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिनांक १२/०७/२०२४ च्या पत्रान्वये सादर केली होती.
कोणत्या प्रसिद्धी माध्यम करिता किती अंदाजे रक्कम आहे याबाबत तपशील आपण जाणून घेऊयात यामध्ये शासकीय संदेशाची निर्मिती १ प्रिंट, ऑडिओ व्हिज्युअल, टीव्हीसी, सेलिब्रेटींसह टीव्हीसी, ऑडिओ, जिंगल्स/स्पॉट्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी इ.करीता रु.3,00,00,000/-(तीन कोटी रु) तर राज्यात आणि राज्याबाहेरील प्रमुख वर्तमानपत्रातील जाहिरातींसाठी 40,00,00,000/- (चाळीस कोटी रु) आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी 39,70,00,000/-(एकोणचाळीस कोटी सत्तर लाख रु.) तसेच बाह्य माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी १३६,३५,००,०००/-(एकशे छत्तीस कोटी पस्तीस लाख रु) यामध्ये होर्डिंग डिजिटल फ्लेक्स बॅनर, एसटी बस स्टेंट हार्डिंग्ज, एलईडी/एलसीडी/ईएसबी स्क्रीन्स, बेस्ट बसेस रॅप, शेल्टर (बीक्युएस), स्ट्रिट लाईट बँकलिट पोल्स, महानगरपालिकांच्या सिटी बस रॅप, साईड पॅनेल, रेल्वे स्टेशन्स एलईडी/एलसीडी स्क्रीन, मेट्रो रेल्वे स्टेशन्स, मेट्रो रेल्वे रॅप/पॅनेल, डिजीटल वॉल पेंटीग, विमानतळावरुन प्रसिद्धी (होर्डिंग, बोर्ड, युनिपोल) एलईडी, डिस्प्ले, विमानतळावरुन प्रसिद्धी (होर्डिंग, एलईडी, डिस्प्ले बोर्ड, विमानतळ टॅक्सी, ऑटो हुड/टॅक्सीवरुन प्रसिद्धी, गृहसंकुलामधून एलईडी एलबीटी यांचा समावेश आहे. आणि सोशल मीडिया/डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी रु.51,00,00,000/- (एक्कावन्न कोटी रु) खर्च तरतूद केली असून यामध्ये एसएमएस इ., मोठ्या प्रमाणात OBD कॉल, WhatsApp चॅटबॉट,WhatsApp संदेशन / प्रसारण केले जाणार आहे अशाप्रकारे एकूण 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम राबविली जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीतील सर्व पक्ष आणि महाविकास आघाडीतील पक्ष आणि उर्वरित राजकीय पक्ष सामाजिक संघटना तयारी करीत आहेत. महायुतीतील प्रमुख राजकीय पक्ष असलेला भाजप २८८ जागांची चाचपणी करीत आहे तर शिवसेना शिंदे पक्षाकडून ९० जागांवर तयारी केली जात आहे तर राष्ट्रवादी अजित दादा गटाकडून ८०-९० विधानसभा मतदारसंघात तयारी केली जात आहे. महायुतीतील घटक पक्षांची मदार जागा वाटपावर आहे तरीही आपापल्या परीने विधानसभा निवडणुकांसाठी चाचपणी सुरु आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष आणि काँग्रेस कडून समसमान जागांवर वाटप करण्याची चर्चा होत आहे.
तर अन्य तिसरी आघाडी तसेच उर्वरित राजकीय पक्ष सामाजिक संघटना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यामध्ये आमदार बच्चू कडू यांच्याकडून शेतकऱ्यांची आघाडी माध्यमातून २८८ जागा तर रविकांत तुपकर ३० ते ३५ जागांवर लढण्याची तयारी करीत आहेत. राजू शेट्टी, महादेव जानकर, माजी पोलीस आयुक्त पांडे यांच्यासह अन्य देखील रणनीती ठरवीत आहेत. मनसेकडून २५० जागांवर चाचपणी सुरु आहे तर वंचित बहुजन आघाडी देखील बहुतांश जागांवर निवडणुकांना सामोरे जाण्याची भूमिका ठेवली आहे. तसेच मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे पाटील यांचा २८८ जागा लढवायच्या की कोणाचे उमेदवारांना पाडून कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणावयाचे याचा खल अजून सुरु आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांचे सामाजिक आंदोलन काहीसे भरकटले आहे त्याचा कितपत परिणाम होईल हे आगामी काळात स्पष्ट होईलच.
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुका लढविण्याची रणनीती केलेली असल्याने योजनांना व्यापक प्रसिद्धी देण्याचा सरकारचा हेतू दिसून येतो मात्र विरोधकांकडून कसे प्रत्युत्तर मिळते यावरून या प्रसिद्धी खर्चाची उधळपट्टी सकारात्मक की नकारात्मक परिणाम करेल यावर अवलंबून असेल. 270 कोटींच्या विशेष प्रसिध्दी मोहिमेचे फलित आगामी विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट होईलच.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 270 कोटींची विशेष प्रसिध्दी मोहिम
Date:

