नवी दिल्ली : संसदेच्या परिसरात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत. पत्रकारांना संसदेच्या परिसरात फिरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या बाईट्स घेता येणार नाहीत. त्यामुळे आता पत्रकारांना संसदेबाहेरील काचेच्या खोलीतून सर्व कामकाज कव्हर करावे लागणार आहे. या नव्या निर्बंधामुळे पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.प्रेस क्लब ऑफ इंडियाने (पीसीआय) पत्रकारांवर लादलेल्या या निर्बंधांचा निषेध केला आहे. प्रेस क्लब ऑफ इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पत्रकार एका छोट्या काचेच्या खोलीत बसलेले दिसत आहेत. या काचेच्या खोलीत खूप गर्दी असते. त्यामुळे हे निर्बंध हटवण्याची मागणी पीसीआयने केली आहे.पूर्वी नवीन संसद भवनाच्या मकर गेटवर पत्रकार खासदारांच्या प्रतिक्रिया घेत असत, पण आता त्यांना तिथे उभे राहू दिले जात नाही. त्यांच्यासाठी मकर गेटसमोर काचेची खोली बनवण्यात आली आहे. आता तेथूनच पत्रकार खासदारांचे कामकाज कव्हर करत आहेत. या कक्षात जागा कमी असल्याने पत्रकारांची गैरसोय होत असल्याचे पत्रकारांचं म्हणणं आहे.