सीमा शुल्क विभागाची कारवाई–शिकार झालेल्या वन गाईला विष देण्यात आलं ती गाई वाघाने खाल्ली आणि वाघाला मारण्यात आलं
पुणे:वाघांची शिकार करून त्यांची कातडी विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे कस्टम विभागाने या प्रकरणी सोमवारी 6 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कातडीची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
वाघाची कातडी विकणारी एक टोळी जळगावजवळ आल्याची माहिती नागपूर सीमा शुल्क विभागाने पुणे सीमा शुल्क विभागाला दिली होती. त्यानुसार पुणे पोलिसांचे एक पथक 26 तारखेला त्याचा तपास करण्यासाठी पुण्याहून निघाले होते. त्यांनी सोमवारी या प्रकरणी कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतले. आरोपींत 2 महिलांचाही समावेश आहे. रहीम रफिक या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती आहे. त्याला यापूर्वीही तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
जप्त करण्यात आलेल्या कातडींत एका 5 फूट वाघिणीच्या कातड्याचा समावेश आहे. ही वाघीण 4 ते 5 वर्षांची असावी असा अंदाज आहे. तस्करामंनी एका वनगाईला विष देऊन ठार मारले. त्यानंतर ही गाय या वाघाच्या तोंडी देऊन त्यालाही ठार मारले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमा शुल्क विभागाने या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद आशर खान नामक आरोपीलाही अटक केली आहे. तो मूळचा भोपाळचा रहिवासी आहे. त्यामुळे जळगावात सापडलेल्या या प्रकरणाचा भोपाळ आणि त्यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करीशी काही संबंध आहे का? याचा धुंडाळा तपास अधिकारी घेत आहेत. पुणे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.