शिवसेनेचा संपाला पाठिंबा.
पुणे-मागील काही दिवसांपासून सातत्याने मागणी करुन देखील, ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमधील’ कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची प्रशासनाकडून पुर्तता करण्यात येत नसल्याने, प्रमोदनाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा कृती समितीद्वारे आज 29 जुलै उत्तररात्री ३ वाजेपासून हडपसर येथील गाडीतळापासून कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत.
१) सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब देण्यात कर्मचाऱ्यांना देण्यात यावी.
२) ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे.
३) कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती देणे
वारंवार मागणी करूनदेखील न्याय मागण्या मान्य न केल्यामुळे, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रमोद नाना भानगिरे यांचे अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन केली होती . या कृती समितीद्वारे दिनांक २२ जूलै २०२४ रोजी मागण्या मान्य न केल्यास पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १५ डेपो बंद करण्याचे पत्र देण्यात आले होते.मात्र पत्राची दखल पुणे महानगर परिवहन लिमिटेडच्या प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. मागण्या मान्य होत नसल्याने, अखेरचा पर्याय म्हणून, आधी स्पष्ट केल्याप्रमाणे पी.एम.पी.एम.एल. चे कर्मचारी आजपासून संपावर जात आहेत.
पुणे महानगर परिवहन लिमिटेडच्या बससेवांचा फायदा दररोज पुण्यातील लाखो नागरिक घेत असतात. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नोकरदार व्यक्ती आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी ‘पुणे महानगर परिवहन लिमिटेड’ च्या बससेवेचा फायदा घेतात. बससेवा बंद झाल्यास,या सर्वांना प्रचंड तोटा होणार आहे, आणि यासाठी सर्वस्वी जबाबदारी पीएमपीएल चे प्रशासन जवाबदार आहे.
याबाबतचे पत्र शिवसेना पुणे यांच्यामार्फत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पोलीस आयुक्तालय पुणे, स्वारगेट पोलीस स्टेशन, एसपी ऑफिस व पुणे महानगर परिवहन महामंडळ प्राशसनास देण्यात आलेले आहेत. तसेच यापूर्वी दिनांक १०/०७/२०२४ रोजी संपाबाबत, पी. एम. पी. एम.एल. प्रशासनाशी पत्रव्यवहार देखील केलेला होता. रोजंदारी सेवकांना कायम करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक, सहव्यवस्थापकीय संचालक नितिन नार्वेकर यांना आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे उत्तर लेखी स्वरूपात पत्र दिले होते. तरीही कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवलेले आहे.त्यामुळे पी एम पी एम एल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आले.