पुरामुळे नुकसान झालेल्या वीस पथकांना साहित्याची देणार भरपाई
पुणे – शहरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात नदीकाठच्या अनेक ढोल-ताशा पथकांचे साहित्य वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या सर्व ढोल-ताशा पथकांच्या मदतीला युवा उद्योजक पुनीत बालन हे धावून आले असून ढोल-ताशा पथकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.
सांस्कृतिक पुण्यात ढोल-ताशा पथकांना एक वेगळेच महत्त्व आहे. गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांचं वादन ऐकण्यासाठी देशभरातील गणेशभक्त आसुसलेले असतात आणि त्याची प्रचिती आपणा सर्वांनाच दरवर्षी येते. ही पथके प्रामुख्याने नदीकाठी असून याच भागात ढोल-ताशा, मंडप, इलेक्ट्रॉनिक्स मशीन इत्यादी साहित्य ठेवण्यात येते. गणेशोत्सवाच्या आधी साधारणपणे दोन-तीन आठवडे नदीकाठावरच ही पथके सराव करत असतात. परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या पुरामध्ये यातील बहुतांश पथकांचे साहित्य वाहून गेले असून काही पथकांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. हे मोठे नुकसान कसे भरुन काढावे, या चिंतेत ढोल-ताशा पथकाचे कार्यकर्ते असतानाच त्यांच्या मदतीला युवा उद्योजक आणि ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख पुनीत बालन हे धावून आले आहेत.
पुनीत बालन यांनी रविवार श्री ओंकारेश्वर मंदिराजवळ या ढोल-ताशा पथकांची आणि गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच गणपती बाप्पाचा भक्त म्हणून या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी चिंतेत असलेल्या ढोल-ताशा पथकांना आश्वस्त केले. त्यांच्या या घोषणेचे ढोल-ताशा पथकांच्या आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आणि त्यांचे आभारही मानले. यापूर्वीही पुनीत बालन हे शहरातील सर्वच गणेश मंडळांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत आणि यापुढेही आपण असेच ठामपणे उभे राहून सांस्कृतिक पुण्याची ओळख कायम राखण्यासाठी काम करु असा शब्द त्यांनी दिला. यावेळी ढोल-ताशा महासंघाचे संजय सातपुते, नितीन पंडीत, यज्ञेश मंडलिक, शिरिश थिटे, अनुप साठे शिगवान, तेजस पाठक, कमलेश कंठे, विशाल भेलके, मंडलिक, अभिजित कुमावत, मनिष पाडेकर, विशाल घरत, प्रकाश राऊत, अमर भालेराव, अनिश पाडेकर, अविनाश बकाल, विनोद आढाव, मंगेश साळुंखे यांच्यासह ढोलताशा महासंघाचे इतर पदाधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
‘‘ढोल-ताशा पथक ही गणेशोत्सवातील प्रमुख ओळख आहेच शिवाय पुण्याचं सांस्कृतिक वैभव आहे. नैसर्गिक आपत्तीत त्यांचं नुकसान झाल्याने त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे एक गणेशभक्त म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. याच भावनेतून ढोल-ताशा पथकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून योगदान देता आलं, याचं समाधान आहे.’’
- पुनीत बालन
(युवा उद्योजक)