पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. ऑलिम्पिक 2024 मधील भारताचे हे पहिले पदक आहे शिवाय 2012 च्या लंडन ऑलिम्पिक नंतर प्रथमच भारताने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले पहिले पदकही आहे.
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा बहुमानही या पदकामुळे मनुला मिळाला आहे. गेल्या 20 वर्षात ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या वैयक्तिक प्रकारात भारतीय महिला अंतिम फेरीत पोहोचली नव्हती. काल मनुने अंतिम फेरी गाठण्याची किमया करून दाखवली.

राज्यवर्धन सिंह राठोड (2004 अथेन्स), अभिनव बिंद्रा (2008 बीजिंग), विजय कुमार (2012 लंडन) आणि गगन नारंग (2012 लंडन) यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनू भाकर ही पाचवी भारतीय नेमबाज ठरली.
पात्रता फेरीतील कामगिरी:
- पात्रता फेरीत 580 गुणांसह मनू भाकर तिसऱ्या स्थानावर राहिली. तिने सर्वाधिक परफेक्ट स्कोअर (27) नोंदवले.
- गेल्या 20 वर्षात वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली! याआधी 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुमा शिरूर अंतिम फेरीत पोहोचली होती.
- कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिलांच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
सरकारी आर्थिक आणि इतर साहाय्य (पॅरिस ऑलिम्पिक):
- दारूगोळा आणि शस्त्रे सर्व्हिसिंग, पेलेट आणि दारूगोळा चाचणी आणि बॅरल निवडीसाठी साहाय्य
- ऑलिम्पिकच्या तयारीसाठी लक्झेंबर्ग येथे वैयक्तिक प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यासोबत प्रशिक्षणासाठी मदत
- टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्स अंतर्गत आर्थिक सहाय्य: 28,78,634/- रूपये
- वार्षिक कॅलेंडर फॉर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन (एसीटीसी) अंतर्गत आर्थिक सहाय्य: 1,35,36,155/- रूपये
आतापर्यंत मिळवलेले यश:
- आशियाई क्रीडा स्पर्धा (एशियाड-2022) मध्ये 25 मीटर पिस्तुल प्रकारात सांघिक सुवर्णपदक
- बाकू येथे 2023 साली झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत, 25 मीटर पिस्तुल प्रकारात सांघिक सुवर्णपदक
- चँगवॉन येथे 2023 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतून, पॅरिस ऑलिंपिक 2024 साठी पात्र
- भोपाळ येथे 2023 मध्ये झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत, 25 मीटर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक
- कैरो येथे 2022 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, 25 मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक
- चेंगडू येथे 2021 साली झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत, 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात, वैयक्तिक आणि महिला सांघिक अशी दोन सुवर्णपदके
पार्श्वभूमी:
मनू भाकर ही नेमबाजीत कौशल्य आजमावणारी एक भारतीय ऑलिम्पिकपटू आहे. मुष्टियोद्धे आणि कुस्तीपटूंसाठी प्रसिद्ध असलेल्या हरयाणामधील झज्जर येथे जन्मलेली मनू भाकर, शाळेत टेनिस, स्केटिंग आणि मुष्टियुद्ध सारखे क्रीडा प्रकार खेळत असे. तिने ‘थांग टा’ नावाच्या मार्शल आर्ट्सच्या प्रकारातही भाग घेत, राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली. 2016 चे रिओ ऑलिम्पिक संपल्यानंतर, फक्त 14 वर्षांची असताना तिने नेमबाजीत कौशल्य आजमावण्याचा मनस्वी निर्णय घेतला आणि तिला ते आवडले, आपल्या निर्णयावर ती ठाम राहिली.
2017 च्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत, मनू भाकरने ऑलिम्पिकपटू आणि माजी जागतिक अव्वल स्थानावरील हिना सिद्धूला चकित केले. या स्पर्धेत तिने 9 सुवर्ण पदके जिंकली. मनूने 242.3 असे विक्रमी गुण मिळवत सिद्धूच्या आशा संपुष्टात आणत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकाराची अंतिम फेरी जिंकली आणि सुवर्ण पदक जिंकले. नेमबाज म्हणून मनू भाकरला 2018 हे वर्ष यशदायक ठरले, कारण वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती नेमबाजीतील किशोरवयीन आकर्षण ठरली.
मेक्सिकोत ग्वाडालजारा येथे 2018 साली आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ISSF वर्ल्ड कप) विश्वचषकात, मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारामध्ये, मेक्सिकोच्या दोन वेळा अजिंक्यवीर ठरलेल्या, अलेजांड्रा झवालाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
मनू भाकरने 2019 म्युनिक ISSF विश्वचषक स्पर्धेत चौथ्या स्थानासह ऑलिम्पिक पात्रतेवरही शिक्कामोर्तब केले. तथापि, तिचे टोकियो ऑलिंपिक 2020 मधील पदार्पण अपेक्षेनुसार झाले नाही. टोकियो 2020 नंतर लगेचच, लिमा इथे झालेल्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत, मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अजिंक्यवीर ठरली आणि 2022 च्या कैरो जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारामध्ये रौप्य, तर 2023 च्या हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
प्रशिक्षण तळ: डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज (नेमबाजी केंद्र), नवी दिल्ली
जन्मस्थान: झज्जर, हरयाणा

