पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संगमवाडी पूल ते मुंढव्यापर्यंत काम सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पामुळे अडथळा निर्माण झाल्याने मागे शहरात पाणी घुसल्याचा आरोप केला आहे. पुण्याचे तत्कालीन महापालिका पदाधिकाऱ्यांच्या अट्टाहासामुळे हा प्रकल्प उभा केला जातो आहे. मात्र त्यामुळे पुणेकरांचं नुकसानच होत असून पुढील पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण झाला तर संबंध पुणे पाण्याखाली असेल अशी चिंता जगताप यांनी व्यक्त केली.
जगताप म्हणाले, मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुण्यातील पूर स्थिती ही राज्य आणि देशाच्या पातळीवर चर्चेचा विषय बनली. परंतु या पुरामुळे सिंहगड रोड ते मुंडवा केशवनगरपर्यंत जी अपरिमित हानी झाली ती निश्चितच क्लेशदायक आहे. पुणेकरांनी एकूणच पूरस्थितीला सामोरे जावं अशी परिस्थिती बिलकुल नव्हती. परंतु पाटबंधारे विभाग जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महापालिकेच्या गलथान कारभारामुळे पुणेकरांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले.पुराच्या परिस्थितीची पूर्वसूचना न देणे, नागरिकांना या संदर्भात अलर्ट न करणे हे नागरिकांच्या जीवाशी खेळणं ठरल्याचं जगताप यांनी म्हटलंय.
जगताप पुढे म्हणाले, मधल्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन महापालिका पदाधिकारी यांच्या कार्यकाळात नदी सुधार प्रकल्प उभा राहीला . साडेसहा हजार कोटींचं कर्ज काढून हा प्रकल्प उभा केला जात आहे. या प्रकल्पामुळेच पुणेकरांना फटका बसला आहे. एकीकडे पाटबंधारे विभाग जी माहिती सांगत आहे ती खोटी आहेच. कमी पाणी सोडलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच्या आधी ५५ ते ६० हजार क्युसेक पाणी सोडूनही कधीही पुराचा फटका बसला नव्हता. पण यावेळी जर पाटबंधारे खात्याच्या सांगण्यानुसार ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असेल. तर मग पुणे पाण्याखाली का आलं? त्याच्या मागचं कारण हे संगमवाडी पूल ते मुंढव्यापर्यंत जो नदी सुधार प्रकल्प हे आहे. या प्रकल्पामुळे नदीच्या प्रवाहात सुमारे ३०० फुटापर्यंत अतिक्रमण होऊन वॉटर लॉकिंग झालं. त्यामुळे आठ ते दहा किलोमीटरचा फुगवटा निर्माण होऊन सिंहगड रोडपर्यंत हे सगळं पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरलं. या ठिकाणच्या नागरिकांचा असं म्हणणं आहे की याआधी त्यांनी ५५ हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह देखील पाहिला आहे. मात्र याआधी पाणी कधी इमारतींमध्ये घुसलं नाही. मात्र दुर्दैवाने नदी सुधार प्रकल्पामुळे पाणी आजूबाजूच्या परिसरांमध्ये पसरलं. त्यामुळे पुणेकरांचं खूप मोठं नुकसान झालं आहे.जगताप शेवटी म्हणाले, नदी सुधार प्रकल्प हा अर्धवट असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परंतु हा प्रकल्प पुढच्या पावसाळ्याआधी पूर्णत्वाला गेला तर संपूर्ण पुणे शहर पाण्याखाली असेल ही वस्तुस्थिती आहे. पुणे महापालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांच्या अट्टहासामुळे हे नुकसान झालं आहे त्यांच्यावर आरोपाची निश्चिती करावी.

