‘कारगिल विजय दिवस – रौप्य महोत्सवी वर्ष’ छायाचित्र प्रदर्शनाला विद्यार्थिनींची पसंती
पुणे, 26 जुलै 2024
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो, पुणे प्रादेशिक कार्यालय आणि MES’s राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कारगिल विजय दिवस – रौप्य महोत्सवी वर्ष’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
पिरंगुट येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय संचार ब्युरो वरिष्ठ लेखा अधिकारी अशोक कुमार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हर्षल आकुडे, पुणे अग्निशमन दलातील पहिली फायरवूमन मेघना सकपाळ, विंग कमांडर एम. यज्ञरामन (निवृत्त), प्राचार्या पूजा जोग आदी मान्यवर उपस्थित होते.

U82N.jpeg)
प्रास्ताविकपर भाषणात क्षेत्रीय प्रचार अधिकारी हर्षल आकुडे यांनी आपल्या केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. केंद्रातील योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा ही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधताना मेघना सकपाळ म्हणाल्या, संरक्षण क्षेत्र अथवा अग्निशमन दल हे काही वर्षांपूर्वी केवळ पुरुषांसाठी समजले जायचे, परंतु इथे काम करण्याची संधी महिलांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे, हे पाहून आनंद वाटतो. दृढ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुरुषांप्रमाणेच कोणत्याही क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणे शक्य असल्याचे मत सकपाळ यांनी व्यक्त केले.

विंग कमांडर एम. यज्ञरामन (निवृत्त) यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना 1999 साली कठीण परिस्थितीतही कारगिलमध्ये भारताने विजय कसा प्राप्त केला याची माहिती विद्यार्थिनींना दिली. या विजयाला आज 25 वर्षे पूर्ण होत असून त्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 500 हुन अधिक जवानांचे बलिदान विद्यार्थिनिंनी कायम स्मरणात ठेवावे, अधिकाधिक संख्येने लष्करात दाखल होऊन देशाची सेवा करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी प्रशालेत ‘कारगिल विजय दिवस – रौप्य महोत्सवी वर्ष’ या विषयावर आधारित छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थिनींनी कारगिल युद्ध काळातील दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याचा लाभ घेतला. तसेच कारगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गीत गायन व ग्रीटिंग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन कार्यक्रमादरम्यान गौरविण्यात आले.
SOIV.jpeg)
याशिवाय, केंद्रीय संचार ब्युरो, पुणे प्रादेशिक कार्यालयातील विभागीय कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत-संगीत व नृत्य कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुषा सामंत, श्रेया दिघे, कॅडेट अग्रता चौधरी व कॅडेट अक्षयिनी माने यांनी केले. तर, आभार पर्यवेक्षक संदीप पवार यांनी मानले.
* * *

