मुंबई- राज्य सरकारमधील अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीच राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतला आहे. अर्थ मंत्रालय सध्या अजित पवार यांच्याकडे आहे. त्यांनीच अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली होती. असे असताना त्यांच्या अर्थ मंत्रालयातीलच अधिकारीच या योजनेवर आक्षेप घेत असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.राज्यावर तब्बल 8 लाख कोटींचे कर्ज असताना योजना राबवायची कशी? असा प्रश्न अर्थ मंत्रालयाकडून राज्य सरकारला विचारण्यात आला आहे. स्वतः अजित पवार या खात्याचे मंत्री असून त्यांनीच या योजनेची घोषणा केली आहे. मात्र, असे असताना अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या या योजनेवर आक्षेप घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. असे असतानाही दरवर्षी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारी तिजोरीमधून 46 हजार कोटी रुपये कसे द्यायचे? असा प्रश्न अर्थ खात्यासमोर आ वासून उभा आहे. मंत्रिमंडळाने लाडकी बहीण योजना आणि त्यासंदर्भातील आर्थिक तरतूदींसाठी मंजुरी दिली असली तरी हा निधी नेमका द्यायचा कसा याची चिंता अर्थ खात्याला लागली आहे. यासंदर्भातील माहिती अर्थ खात्यातील सूत्रांनीच दिल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
प्रस्तुत योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते. या योजनेतून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतील. वय वर्षे 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रात देखील मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. यातील पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दरम्यान देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या योजनेची घोषणा झाल्यानंतर आता राज्यभरात महिलांनी योजनेचे अर्ज भरण्यासाठी गर्दी केली आहे. ठिकठिकाणी त्यासाठी पदाधिकारी व्यवस्था देखील करीत आहेत. त्यामुळे योजनेला महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
गोरगरीब महिलांच्या खात्यात पैसे जाण्याची वेळ आल्यावरच तुम्हाला तिजोरी आठवते का?
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिला या अमेझॉन वर शॉपिंग करणाऱ्या नाहीत. त्या आसपासच्या दुकानातून आणि मंडितून खरेदी करतात. त्यांच्या हातात पैसा आल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महिलांवर अन्याय करण्याची इच्छा असणाऱ्यांनाच राज्याची चिंता सतावत असल्याचे टिका देखील त्यांनी केली. गोरगरीब महिलांच्या खात्यात पैसे जाण्याची वेळ आल्यानेच तुम्हाला तिजोरी आठवते का? असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

