पुणे-कर्वेनगर मधील समर्थ पथ,विठ्ठल मंदिर रस्त्यावरील सोसायट्या, ताथवडे उद्यान समोरील भाग येथे कायमस्वरूपी उपाययोजना करा अशी मागणी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’दोन वर्षांपासून समर्थ पथावरील प्रतिज्ञा मंगल कार्यालयासमोरील चिंतामणी, गंगानगरी, मोरयाकृपा व अन्य सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरत आहे.येथे असलेल्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरत असून थोडा मोठा पाऊस झाला की येथील सर्व भागात पाणी साचते व सोसायटी्यांचे पार्किंग पाण्याने भरून जाते व वीज मीटर खाली असल्यामुळे वीज देखील बंद करावी लागते व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गतवर्षी रात्री उशिरापर्यंत थांबून स्वतः तत्कालीन मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी येथे पाणी उपसण्याच्या कामात लक्ष घातले होते तर यावर्षी देखील 8 जून ला अशीच परिस्थिती उद्भवली होती व मी आपणास सतर्क केले होते. तसेच विठ्ठल मंदिर रस्त्यावर स्नेह म्हाडा सोसायटी, कुमार परितोष सोसायटी, शहीद मेजर ताथवडे उद्यानासमोरील मधुसंचय समोरील गल्लीतील बंगले व सोसायटीत तसेच नदीपात्राजवळील राजपूत वीटभट्टी, खिलारेवाडी, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करून पाणी उपसा करत आहे. मात्र यंत्रणा देखील कमी पडत आहे. येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी करत आहे. आत्ताचा पाऊस ओसरल्यावर केवळ ह्या भागातच नाही तर शहरातील अश्या सर्व ठिकाणाची पाहणी करून पाणी साचणार नाही यासाठी काय करता येईल यावर तज्ञाचा सल्ला घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी .
कर्वेनगरमधील समर्थ पथ,विठ्ठल मंदिर रस्त्यावरील सोसायट्या, ताथवडे उद्यान समोरील भाग येथे कायमस्वरूपी उपाययोजना करा-खर्डेकर
Date:

