पुणे, दि. २४: मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण मोहीमेअंतर्गत ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून मतदार नोंदणीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करुन मतदार जनजागृती करण्यात येत आहे; हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.
स्वीप अंतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्रशाला विश्रांतवाडी, पंकज आसमान सोसायटी संतनगर लोहगाव, अण्णाभाऊ साठे सभागृह, विश्रांतवाडी, अण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी खुर्द, कुमार प्राईम वेरा सोसायटी वडगाव शेरी, पंचशील नगर विश्रांतवाडी, हमीद उर्दूशाळा लक्ष्मीनगर येथे नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिरुर विधानसभा मतदारसंघात जीवनज्योती सामाजिक विकास संस्था शिक्रापूर आणि तहसील कार्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्रापूर येथे आयोजित मतदार नोंदणी शिबिरात सुमारे ३०० हून अधिक नवमतदार म्हणून नोंदणी करण्यात आली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती तांबे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पात्र नागरिकांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण मोहीमेअंतर्गत १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी मतदार यादीत ऑनलाईन नावनोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला भेट द्यावी. ऑनलाईन अर्जाची प्रत मतदार नोंदणी अधिकारी किंवा तहसील कार्यालयात सादर करता येईल. जिल्ह्यातील मतदार नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे.

