पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पक्षाचा पुणे शहरातील पदाधिकारी मेळावा लोकमान्य सभागृह, नारायण पेठ येथे पार पडला.दीपक मानकर आणि मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .
यावेळी बोलताना भाषणाच्या शेवटी अजितदादा म्हणाले लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी म्हंटले. त्यांनी , महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचे जाहीर सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले, माझा अंदाज आहे की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात होतील. मात्र, त्यासोबतच लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत. कार्यकर्त्यांनी देखील अधिक जोमाने कामाला लागले पाहिजे, माझ्यासह नेत्यांनी, मंत्र्यांनी दौरे केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जातात. पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतलेला आहे. विरोधी पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाही. काहीजण गेले, त्यांना स्वातंत्र्य आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे, वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलेलो आहे. आम्ही सगळे लोक दौरे काढणार आहोत, सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे शिबीर घ्यावे लागणार आहे. आपले मंत्री व पदाधिकारी यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे. न कमी पडता प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला सुरुवात करायची आहे, असे आवाहन देखील दादांनी केले.
2004 पासून मी पालकमंत्री म्हणून काम केलं, आरोप प्रत्यारोपला मी उत्तर देत नाही. मावळात पैसे गेले मावळात पैसे गेले अस बोललं जात होतं, आधी बारामती शिरूरला निधी दिला त्यावर कोणी बोलत नाहीत. सगळ्या आमदार खासदारांना मी बोलू दिलं, कारण नसताना नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हणत डीपीडीसीच्या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळेंच्या आरोपावर अजित पवारांनी पलटवार केला.मीडिया पुढे काही तरी वेगळं मांडण्यात आले. वडीलधाऱ्यांना बोलू दिलं जातं नाही अस सागितले. पण तसे काही नाही, सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला दिली आहे, असेही अजित पवार म्हणाले. विशाळगड येथे जे घडू नये ते घडलं, कोर्टाने आदेश दिले आहेत, तर त्यांना आता मदत केली. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जाती जातीमध्ये सलोखा राहिला पाहिजे, सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

