पुणे, 20 जुलै 2024
सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापन करून केंद्रातील मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात जे सकारात्मक आणि धाडसी निर्णय घेतले त्यामुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज सांगितले.
पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . संस्थेमधील कृषी आणि कृषी क्षेत्राशी संलग्न अभ्यासक्रमाच्या 32 व्या तुकडीतील 99 विद्यार्थ्यांना या वेळी मोहोळ यांच्या हस्ते पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
वैकुंठ मेहता सहकार संस्था ही सहकार क्षेत्रातील देशभरातील सर्वात जुनी प्रशिक्षण संस्था असल्याचे नमूद करून मोहोळ पुढे म्हणाले की , जगात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करीत असून त्यात सहकार क्षेत्राचे योगदान मोलाचे राहिले आहे . या क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची लागणारी गरज वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्था अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडत आहे . देशाचा सहकार वृध्दींगत करण्यात तुमच्या सारख्या प्रशिक्षित तरुणांची भूमिका फार महत्वाची ठरणार असून भारताला आगामी काळात विकसित बनवण्याच्या कार्यात तरुणांनी भरीव योगदान देण्याचे आवाहन मोहोळ यांनी यावेळी केले.
पुणे ही शिक्षणाची पंढरी असून अशा पुण्यनगरीत शिक्षण घेण्याची संधी तुम्हा विद्यार्थ्यांना मिळाली त्याचा भावी आयुष्यात फार मोठा फायदा होणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
संस्थेमधील नव्या आणि जुन्या विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद घडून यावा यासाठी तयार करण्यात आलेल्या एक्झिक्युटिव्ह एज या ॲप चे उद्घाटन यावेळी मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले . संस्थेच्या संचालक डॉ. हेमा यादव यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले तर कुलसचिव डॉ. ए. के. अस्थाना यांनी आभार मानले.

